मुलांमधील हृदयविकाराच्या वाढत्या समस्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सिद्धिविनायक मंदिर ते वाडिया रुग्णालयादरम्यान रविवारी लिटील हार्ट्स मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनमधून जमा झालेला निधी बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल येथे उभारण्यात येणार्या कार्डियाक (हृदयविकार) सेंटर सुरू करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे कार्डियाक शस्त्रक्रियेची गरज असलेल्या गरीब लहान मुलांसाठी शस्त्रक्रियेचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती वाडिया हॉस्पिटलचे सीईओ डॉ. मिनी बोधनवाला यांनी दिली.
सिद्धिविनायक ट्रस्ट आणि परळ पूर्व येथील बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, वाडिया हॉस्पिटलचे सीईओ डॉ. मिनी बोधनवाला यांच्या हस्ते मॅरेथॉनचे उद््घाटन करण्यात आले. मुले व पालकांच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एक आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी आपणा सर्वांना विचारशील प्रयत्न करून जागरूक राहण्याची गरज आहे, असा सल्ला राज्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी दिला. श्रेयस तळपदे आणि नव्याने प्रदर्शित झालेल्या बाजी चित्रपटाची संपूर्ण टीम आणि संस्थेचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. यंदा मॅरेथॉनचे हे दुसरे वर्ष असूनजवळपास १0 हजारांहून अधिक मुले व पालकांनी सहभाग घेतला. मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या मुले व पालकांनी समाजाला प्रेराणादायी ठरणारे व जागृती घडवून आणणारे संदेश दिले. त्यात स्त्रीभ्रूण हत्या, पर्यावरण वाचवा, झाडे लावा - झाडे जगवा हाच आरोग्यदायी जीवनाचा कानमंत्र आहे, असे अनेक संदेश या मॅरेथॉनदरम्यान देण्यात आले.
