मुंबई - महापालिका शाळेतील संगीत शिक्षक मिलिंद करमरकर यांच्या महाराष्ट्रातील किल्ल्यांवर रचलेल्या व त्यांनीच संगीतबद्ध केलेल्या `गीत दुर्गायन' या संगीत अल्बमच्या निमित्ताने महापालिका शाळेतील एका संगीत शिक्षकाच्या कलासेवेची दखल "लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्" द्वारे घेतली जावी, हे निश्चितच अभिनंदनीय असल्याचे कौतुकोद्गार मुंबईच्या उपमहापौर अलका केरकर यांनी काढले.
महापालिका शिक्षण विभागाच्या दादर येथील मुख्यालयात आयोजित एका समारंभा दरम्यान मिलिंद करमरकर यांचा विशेष सत्कार करतेवेळी उपस्थित मान्यवरांशी संवाद साधताना त्या (दि.३१ मार्च, २०१५) बोलत होत्या. याप्रसंगी महापालिकेचे उपशिक्षणाधिकारी सर्वश्री रविंद्र काळे, चंद्रकेश सिंह व भरत पांड्ये यांच्यासह मोठया संख्येने शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.
महापालिकेच्या `के / पश्चिम' विभा गातील व जोगेश्वरी परिसरातील `ओशिवरा मराठी मनपा शाळा क्र.२' येथील संगीत शिक्षक मिलिंद करमरकर यांनी महाराष्ट्राच्या गौरवपूर्ण इतिहासाचा साक्षीदार असणाऱया २५ किल्ल्यांवर लिहिलेल्या व संगीतबद्ध् केलेल्या २५ गीतांचा समावेश असलेल्या `गीत दुर्गायन' या संगीत अल्बमची दखल नुकतीच लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली आहे. ऐतिहासिक वास्तूंवर काव्यरचना करुन त्यांना संगीतबद्ध् करणे ही एक वेगळी व गौरवपूर्ण बाब असून राष्ट्रीय विक्रम असल्याचे लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसने नमूद केले आहे. करमरकर यांच्या याच कामगिरीबाबत त्यांचा उपमहापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
