मुंबई महापालिकेच्या जकात विभागाची बनावट वेबसाईट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई महापालिकेच्या जकात विभागाची बनावट वेबसाईट

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव : मुंबई महापालिकेमध्ये जकात चोरी हा विषय नेहमीच गाजत असतो. या जकात चोरी मध्ये अधिकारी आणि दलालांचा सहभाग असल्याची चर्चा असते. आता तर पालिकेच्या जकात विभागाचे बनावट वेबसाईट तयार करण्यात आल्याचे मंगळवारी (३१ मार्च) उघडकीस आले आहे. याबाबतची लेखी तक्रार पालिकेने पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाकडे नोंदवली आहे. या प्रकरणाची चौकशी मुंबई आयआयटीनेही करावी, अशी विनंती आयआयटीला करण्यात येणार आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी पत्रकारांना दिली. 

महानगर पालिकेच्या जकात विभागाच्या अधिकृत वेबसाईटचा पत्ता www.mcgmoctroi.com असा २0११ पासून असताना, बनावट वेबसाईट मात्र www.mcgmoctroi.in या नावाने कार्यान्वित असल्याचे निदर्शनास आले आहे. हि बनावट वेबसाईट 'नॅशनल इंटरनेट एक्स्चेंज ऑफ इंडिया' या सर्व्हरवर १५ जानेवारी २0१५ पासून राकेश बापट यांच्या नावे करण्यात आली आहे. त्यांचा पत्ता, १0९, पहिला मजला, सुदर्शन, सी विंग, अचोले रोड, नालासोपारा, पूर्व असा असल्याचे मुखर्जी यांनी पत्रकारांना सांगितले. 

www.mcgmoctroi.com या अधिकृत वेबसाईटशी साधम्र्य असणारी वेबसाईट www.mcgmoctroi.in या नावाने नोंद झाली होती का, या वेबसाईटची नोंदणी, कोणी, कधी, कुठून केली, नूतनीकरण कुणी केले याचा तपशील तपासण्यात येणार आहे. पालिकेच्या मूळ व बनावट वेबसाईटवरील स्क्रिनवर सर्व बाबी व लोगो सारख्या आहेत. भविष्यात पुनरावृत्ती टाळण्यासाठी जकात खात्याच्या संगणकीय प्रणालीत योजनाबद्ध सुरक्षा प्रणाली तयार करण्यात येणार आहे आणि सायबर सेलकडे याबाबत तक्रार नोंदवताना, 'नॅशनल इंटरनेट एक्स्चेंज ऑफ इंडिया' या अधिकृत नोंदणीदारांकडून अधिक माहिती मिळवण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे असे मुखर्जी यांनी सांगितले.  

बनावट जकात पावत्यांद्वारे जकात चोरीस आळा घालण्यासाठी आणि आयातदार व मुंबई महापालिकेची फसवणूक टाळण्यासाठी मुंबई पालिकेने 'मे. विदर्भ इन्फोटेक'द्वारा जकात पावत्यांच्या सत्यतेबाबत खातरजमा करण्यासाठी संगणक प्रणालीत सुधारणा केली होती. पण बनावट वेबसाईटवर फक्त जकात पावत्यांबाबतच्या पडताळणीची प्रणाली कार्यान्वित करून, बनावट पावत्यांवरून आयातदारांना त्या पावत्या अधिकृत वाटाव्या यासाठी संकेतस्थळाच्या वापराची शक्यता मुखर्जी यांनी व्यक्त केली. मुंबई महापालिकेस जकात भरणा केल्यानंतर जकातीच्या पावत्यांच्या सत्यतेबाबत खातरजमा करण्यासाठी पालिकेच्या www.mcgmoctroi.com या अधिकृत वेबसाईटचाच वापर करावा असे आवाहन मुखर्जी यांनी केले आहे. 



Post Bottom Ad

JPN NEWS

Pages