मुंबई / प्रतिनिधी - बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी उपक्रमाच्या आर्थिक स्थिती बाबत सविस्तर माहिती स्थ्यी समितीला देणे आवश्यक आहे. पालिकेकडून बेस्टला दिलेल्या आर्थिक मदतीचा विनियोग कश्या प्रकारे करण्यात आला याचा संपूर्ण लेखाजोखा देण्याचे निर्देश महाव्यवस्थापकांना देण्यात यावेत तसेच बेस्ट संदर्भात पालिकेने श्वेत पत्रिका काढावी अशी मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी स्थायी समितीत केली.
बेस्टला पालिकेकडून अनुदान देण्यात येते. याबाबत स्थायी समिती बैठकीत प्रस्ताव आला होता. या प्रस्तावावर बोलताना पालिका बेस्टला कायमस्वरूपी निधी देणार का, बेस्टला सक्षम बनवण्यासाठी पालिकेने कोणती पाऊले उचलली, वाहतूक कोंडीमुळे बेस्टला सर्वाधिक तोटा होत असल्याने बेस्ट साठी वेगळी मार्गिका ठेवण्याबाबत निर्णय का घेतला जात नाही असे प्रश्न सुधीर जाधव यांनी उपस्थित केले. बेस्टकडून शासन अनेक सवलती घेत असते मग शासनाने बेस्टला टोलमुक्त करावे अशी मागणी सुनील अहिर यांनी केली.
गेल्या ६ महिन्यात बेस्टचे ४ लाख प्रवाशी कमी झालेत असे दिलीप पटेल यांनी निदर्शनास आणत महाव्यवस्थापकांनी स्थायी समितीत उपस्थित राहून बेस्टला सक्षम करण्यासाठी काय उपाययोजना केल्या याची माहिती द्यायला हवी असे पटेल यांनी सांगितले. बेस्टचा परिवहन विभाग नेहमीच तोट्यात राहिला आहे याचा विचार करून राज्य सरकारने एसटी प्रमाणेच बेस्टला सबसिडी द्यावी अशी मागणी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी केली. यावर पालिकेकडून बेस्टला देण्यात आलेल्या १५० कोटी रुपयांची माहिती घेण्यात येईल. तसेच १०० कोटी रुपये हे फक्त बसगाड्या खरेदी करण्यासाठी आहेत असे स्पष्ट करत बेस्टबाबत विशेष बैठक लावण्यात येईल असे स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी सांगितले.

