मुंबई / अजेयकुमार जाधव
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या बौद्धजन पंचायत समितीच्या दादर भोईवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी आरक्षणात आवश्यक असणारे बदल करण्यासाठी सुधार समिती सकारात्मक निर्णय घेईल असे आश्वासन समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी बौद्धजन पंचायत समितीच्या स्मारक सभागृहाला दिलेल्या भेटी दरम्यान दिले होते. या आश्वासना नुसार लवकरच एक संयुक्त बैठक लावून सभागृहाचा विषय मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी दिली आहे.
मुंबई महानगर पालिकेने दादर भोईवाडा येथे जेरबाई वाडिया मार्ग येथे 1956 मधे 40 बाय 70 चौ.मी.जागा बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी दिली होती. 1974 मधे पालिकेने बौद्धजन पंचायत समितीला 1000 चौ.मी.इतका भूखंड कराराने दिला आहे. या भूखंडावर बौद्धजन पंचायत समितीचे मुख्य कार्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह हॉल ५० ते ६० वर्षाहून अधिक काळा पासून आहे. याच भूखंडावर अतिक्रमण झालेल्या झोपड्या असल्याने 1995 नंतर एसआरए प्रोजेक्ट राबवण्यात आल्याने संस्थेकड़े फ़क्त 495 चौ.मी. इतकाच भूखंड बाकी राहिला होता. या बाकी जागे पैकी 140.12 चौ. मी. भूखंड बेघरांच्या आरक्षित करावा अशी मागणी करत उरलेल्या 350 चौ. मी. जागेवर स्मारक सभागृह बांधावे असा बदल करण्याची मागणी सुधार समिती सदस्यांकडून केली जात होती. परंतू जो काही उरलेला भूखंड आहे तो तरी बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक सभागृहाला मिळावा अशी मागणी बौद्धजन पंचायत समिती आणि आंबेडकरी जनते कडून केली जात होती.
याबाबत ३० एप्रिलला सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे, सुधार समितीचे सदस्य मोहन मीठबावकार, ज्योत्स्ना दीघे, श्रद्धा जाधव यांनी भेट दिली होती. या भेटी दरम्यान प्रकाश गंगाधरे यांनी पंचायत समितीला स्मारक सभागृह बांधण्यासाठी सकारात्मक निर्णय घेईल असे आश्वासन दिले होते. सुधार समितीने सभागृहाला दिलेल्या भेटी नंतर सोमवारी १८ मेला सुधार समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये डॉ. आंबेडकर स्मारक सभागृह बांधण्यासाठी आरक्षण उठवण्याची जी परवानगी हवी आहे. या परवानगीसाठी संयुक्त बैठक लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच पालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक लावून सभागृह बांधण्यासाठी लागणाऱ्या जागेचा विषय मार्गी लावणार असल्याची माहिती गंगाधरे यांनी दिली आहे.

