पावसाळ्यासाठी रेल्वे सज्ज - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 May 2015

पावसाळ्यासाठी रेल्वे सज्ज

मुंबई (प्रतिनिधी): येत्या पावसाळ्याला सामोरे जाण्यासाठी मध्य आणि पश्‍चिम रेल्वे सज्ज झाली आहे. रेल्वेच्या हद्दीतील नाल्यांची सफाई, नाल्यातील गाळ काढणे, रेल्वे मार्गात झुकणार्‍या झाडांच्या फांद्या मुंबई महापालिकेच्या मदतीने कापणे, जेथे दरड कोसळण्याची शक्यता आहे तेथे उपाययोजना करणे, रेल्वे मार्गात पाणी तुंबण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी पाणी उपशासाठी पंपांची व्यवस्था, डिजीटल काऊंटर्सची सुविधा कार्यान्वित करणे आदी कामे पावसाळय़ाआधी केली आहेत, असा दावा दोन्ही रेल्वे यंत्रणांनी केली आहे. काही कामे ३0 मे आधी पूर्ण करण्यात येतील, असेही रेल्वे अधिकार्‍यांनी सांगितले. 

पाणी तुंबल्यास त्याचा तत्काळ उपसा करण्यासाठी 'मध्य'च्या ३२ ठिकाणी ३९ पंप, 'पश्‍चिम'चे ८0 डिझेल पंप कार्यरत होणार आहेत. मशीद, माझगाव यार्ड, भायखळा, करी रोड, शीव, कुर्ला, विक्रोळी, घाटकोपर, नानेपाडा, ठाणे, डोंबिवली, शिवडी, वडाळा, चुनाभट्टी, कोपरखैरणे, चर्नी रोड, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल, एल्फिन्स्टन रोड, दादर, माहीम, वांद्रे, खार, अंधेरी, जोगेश्‍वरी, नालासोपारा, विरार येथे पाणी तुंबण्याची शक्यता असल्यामुळे रेल्वे यंत्रणा येथे विशेष लक्ष ठेवणार असून, पाणी तुंबल्यास त्याचा उपसा करण्यासाठी पंपांची व्यवस्था केली आहे. मध्य रेल्वेच्या हद्दीत ८७ कल्व्हर्ट असून, ८४ कल्व्हर्टची सफाई झाली आहे, उर्वरित कामे ३0 मेपर्यंत होतील, असा दावा मध्य रेल्वेने केला आहे. आणि पश्‍चिम रेल्वेने सर्व ४३ कल्व्हर्टची सफाई केली आहे. मध्य रेल्वेने १ लाख २७ हजार ७७९ मीटर्सची नालेसफाई केली असून, पश्‍चिम रेल्वे पावसाळय़ाआधी नालेसफाई पूर्ण करणार आहे.

रेल्वे मार्गात झुकणार्‍या फांद्यांचा ७00 ठिकाणी अडथळा निर्माण होत असल्याने त्या पालिकेच्या मदतीने छाटल्या आहेत, असा दावा मध्य आणि पश्‍चिम रेल्वेने केला आहे. पावसाळय़ात लोकल वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी तसेच काही आपत्ती ओढवल्यास, पूरसदृश परिस्थिती उद्भवल्यास रेल्वे, आपत्कालीन व्यवस्थापन, मुंबई महापालिका आदी यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी मध्य रेल्वे २४*७, अहोरात्र नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवणार आहे.

पावसाळय़ात ओव्हरहेड यंत्रणा, वीज यंत्रणा, लोकल बिघडण्याची तसेच लोकलच्या छतामधून पाणी गळून ते डब्यात टपकण्याची शक्यता असते. हे लक्षात घेता पश्‍चिम रेल्वेने या यंत्रणांची पावसाळापूर्व तपासणी सुरू केली आहे तसेच मुंबई महापालिकेचे अधिकारी यांच्यासोबत पावसाळापूर्व कामांची संयुक्त पाहणी सुरू करण्यात आली आहे, असा दावा पश्‍चिम रेल्वेने केला आहे.

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS