हाऊसिंग स्टॉकसाठी 67 वर्षे वाट पाहायची का - प्रकाश मेहता - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 June 2015

हाऊसिंग स्टॉकसाठी 67 वर्षे वाट पाहायची का - प्रकाश मेहता

मुंबई - म्हाडाचा घरबांधणीचा वेग वर्षाला एक हजार आहे. वसाहतींच्या पुनर्विकासातून मिळणाऱ्या 67 हजार घरांच्या स्टॉकसाठी मग 67 वर्षे थांबायचे का, असा सवाल गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी रविवारी (ता. 31) रंगशारदा सभागृहात म्हाडाच्या सोडतीदरम्यान उपस्थित केला. काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असेही संकेत त्यांनी या वेळी दिले. 

म्हाडाच्या सोडत कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मेहता उपस्थित होते. प्रस्तावित गृहनिर्माण धोरण व म्हाडावर मंत्र्यांनी या वेळी भाष्य केले. म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासातून 67 हजार घरांचा हाऊसिंग स्टॉक अपेक्षित आहे; पण म्हाडाचा वेग पाहता 67 वर्षे लागतील. त्यासाठी आगामी गृहनिर्माण धोरणात सर्व बाबींचा विचार केला जाईल. काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. प्रस्तावित गृहनिर्माण धोरणाच्या मसुद्यावर हरकती येण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहितीही या वेळी त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई व मुंबईबाहेरच्या आमदारांची बैठक होणार आहे. त्यात, टप्प्या-टप्प्याने सर्व विषयांवर चर्चा होणार आहे, असेही मेहता म्हणाले. 

यावेळी मुंबईत छोटेसे घर असावे अशी इच्छा असणाऱ्या एक लाख 25 हजारांहून अधिक अर्जदारांनी नशीब आजमावले. प्रत्येक घरासाठी 125 हून अधिक अर्जदार शर्यतीत होते. रंगशारदा सभागृहाबाहेरील मंडपात त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. सोडतीचे थेट प्रक्षेपण पाहता यावे, यासाठी मंडपात टीव्हीही ठेवण्यात आला होता. यंदाच्या वर्षी सोडतीचा कार्यक्रम पाहण्यासाठी अर्जदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गतवर्षीच्या तुलनेत सभागृहात मोठ्या संख्येने अर्जदार उपस्थित होते. सोडतीत घर लागलेल्या विजेत्यांचा सत्कार करण्यात येत होता. दरम्यान, घरांच्या सोडतीत अपयशी ठरलेल्या अर्जदारांना आठवडाभरात त्यांची अनामत रक्कम परत दिली जाईल, असे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सोडती वेळी स्पष्ट केले आहे.
JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS