बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 June 2015

बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा

मुंबई : राज्यातील बोगस एमडी डॉक्टरांवर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने कारवाईचा बडगा उगारला आहे. दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून पदवी प्राप्त करून एमडी डॉक्टर असल्याचा दावा करणार्‍या बोगस डॉक्टरांवर मेडिकल कौन्सिलमार्फत ही कारवाई केली जात आहे. या डॉक्टरांनी मिळवलेल्या पदवीला मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया तसेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची मान्यता नसल्याचे कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. किशोर ताओरी यांनी सांगितले.
मेडिकल कौन्सिलच्या आकडेवारीनुसार, राज्यात जवळपास ६00 बोगस डॉक्टर आहेत. अशा डॉक्टरांना नोटिसा बजावून एमडी डॉक्टर असल्याचा बोर्ड न लावण्याच्या सूचना केल्या गेल्या आहेत. तसेच विविध प्रकारच्या कागदपत्रांवरही 'एमडी'चा उल्लेख करण्यास मनाई केली गेली आहे. या बोगस डॉक्टरांचा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची मान्यता असलेली पदवी प्राप्त करणार्‍या डॉक्टरांना फटका बसत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील एका डॉक्टरने दोन बोगस डॉक्टरांविरुद्ध महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे तक्रार नोंदवली. त्या तक्रारीची कौन्सिलने गंभीर दखल घेतली आणि संबंधित बोगस डॉक्टरांना तातडीने त्यांची 'एमडी'चा उल्लेख असलेली लेटरहेड्स तसेच अन्य स्टेशनरी जाळून टाकण्याची सूचना केली. डॉ. राजेंद्र राजगुरू आणि डॉ. पंजाब शेजोल या दोन बोगस डॉक्टरांना यापुढे एमडी डॉक्टर असल्याचा दावा न करण्याची तंबी देण्यात आली आहे. अशाच पद्धतीने मुंबईसह संपूर्ण राज्यभरातील बोगस डॉक्टरांविरोधात कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष ताओरी यांनी स्पष्ट केले. राज्यातील जवळपास ६00 डॉक्टरांनी रशिया, युक्रेन, चीन येथील विद्यापीठांतून वैद्यकीय पदवी प्राप्त केल्याचे मेडिकल कौन्सिलच्या निदर्शनास आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS