स्मार्ट सिटी ची स्वप्ने दाखवणाऱ्यांनो, अगोदर सेफ सिटी उपलब्ध करून द्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 October 2015

स्मार्ट सिटी ची स्वप्ने दाखवणाऱ्यांनो, अगोदर सेफ सिटी उपलब्ध करून द्या


कुर्ला सिलिंडर स्फोटाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- सचिन अहिर 
 मुंबई ( प्रतिनिधी ) - स्मार्ट सिट ची स्वप्ने दाखवणाऱ्यांनी अगोदर नागरिकांना सेफ सिटी उपलब्ध करून द्या  असा टोला लगावत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी कुर्ला येथे शुक्रवारी झालेल्या सिलिंडर स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना तात्काळ मदत देण्याची मागणी केली आहे. शिवाय या दुर्दैवी घटनेला जबाबदार असणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी  विशेष टास्कफोर्स ची स्थापना करण्याचा सल्ला त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.

मुंबईतील कुर्ला परिसरातील कमानी भागात शुक्रवारी सिटी किनारा या चायनिज रेस्टॉरंटमध्ये गॅसची गळती होऊन शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या स्फोटात एका अभियंत्यासह सात महाविद्यालयीन तरूणाचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेवर शोक व्यक्त करत अहिर म्हणाले की, व्यावसायिक वापरासाठी गॅसचा वापर करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागासह अग्निशमन दलाच्या परवानगीची गरज असते. मात्र कुर्ला येथील या दुर्घटनाग्रस्त हॉटेलला अशी कोणतीही परवानगी नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे या दुर्घटनेला महापालिका अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असून अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी  सचिन अहिर यांनी केली.     

मुंबईत अशा पद्धतीने महापालिका अधिकाऱ्यांना लाच देऊन सर्रासपणे छोटी मोठी हॉटेल्स विना परवाना व्यवसाय करत असतात. यासाठी लागणारे गॅस कनेक्शनही अशाच पद्धतीने लाच देऊन घेतले जाते. त्यामुळे राज्य सरकार किंवा महापालिका प्रशासनाने या सर्व गैर कारांना आळा घालण्यासाठी एका विशेष टास्क फोर्सचीस्थापना करून शहरातील सर्व हॉटेल्सची सुरक्षेच्या दृष्टीने पुनर्तपासणी करावी. तसेच अशा पद्धतीने सर्वसामान्यांच्या मृत्युला कारणीभूत ठरणाऱ्या अनधिकृतहॉटेल्सच्या मालकांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

मृतांच्या कुटुबियांना तात्काळ मदत करा        
मुंबईतील मालवणी भागात काही दिवसांपुर्वी विषारी दारूकांडात बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ज्या पद्धतीने राज्य शासनाने मदत जाहिर केली होती. त्याच धर्तीवर कुर्ला येथील दुर्दैवी सीलिंडर स्फोटात हकनाक बळी पडलेल्या मृतांच्या कुटुंबियांनाही राज्य सरकार किंवा मुंबई महापालिकेच्या वतीने तात्काळ भरीव मदतकरण्याची मागणी ही सचिन अहिर यांनी केली.

Post Bottom Ad

JPN NEWS