रस्ते निविदा पूर्णपणे ऑनलाईन तसेच कंत्राटदारांना गुणवत्ता नियंत्रण अभियंत्यांची नेमणूक बंधनकारक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रस्ते निविदा पूर्णपणे ऑनलाईन तसेच कंत्राटदारांना गुणवत्ता नियंत्रण अभियंत्यांची नेमणूक बंधनकारक

Share This

रस्त्यांची कामे अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी महापालिका आयुक्तांचे आदेश
मुंबई / प्रतिनिधी / 6 Oct 2015
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते बांधकामांबाबत निविदा प्रक्रिया अधिक स्पर्धात्मक व पारदर्शक व्हावी यासाठी तसेच कंत्राटदाराची ओळख गोपनीय रहावी या प्रमुख उद्देशाने रस्ते निविदा प्रक्रिया पूर्णपणे 'ऑनलाईन' पध्दतीने करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्री. अजोय मेहता यांनी आज (दि.०६/१०/२०१५) दिले. त्याचबरोबर रस्त्यांची कामे अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी प्रत्येक कंत्राटाच्या अंमलबजावणीमध्ये गुणवत्ता नियंत्रण अभियंत्यांची नेमणूक करणे कंत्राटदारांना बंधनकारक करण्याचे आदेश देखील महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.


रस्ते बांधकामासाठीच्या निविदा प्रक्रियेमध्ये अधिकाधिक कंत्राटदारांना सहभाग नोंदविता यावा, जेणेकरुन निविदा प्रक्रियेतील स्पर्धात्मकता जपली जावी व कंत्राटदाराची ओळख गोपनीय राहावी या दृष्टीने संपूर्ण निविदा प्रक्रिया 'ऑनलाईन' करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्री. अजोय मेहता यांनी दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने इएमडी (अर्नेस्ट मनी डिपॉझीट) व एएसडी (ऍडीशनल सिक्युरिटी डिपॉझीट) याकरिता आतापर्यंत कंत्राटदारांना संबंधित रकमेच्या 'डिमांड ड्राफ्ट' ची स्कॅन कॉपी / छायाप्रत देणे बंधनकारक होते व ते न दिल्यास त्यांची निविदा उघडण्यात येत नव्हती. आता ही प्रक्रिया पूर्णपणे रद्दबातल करण्यात आली आहे.
याऐवजी आता संपूर्णपणे ऑनलाईन प्रक्रिया अंमलात आणण्यात येत आहे. तसेच निविदा प्रक्रिया पूर्ण होईस्तोवर संबंधित अर्जदारास कोणत्याही प्रकारचा प्रत्यक्ष कागद महापालिकेकडे सादर करावा लागणार नाही. या सर्व प्रक्रियेचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे निविदेचा तपशिल व निविदा भरणा-या अर्जदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय राहणार आहे.

त्याचबरोबर निविदा अर्ज करण्यासाठी जो कालावधी निश्चित करण्यात आला असेल, त्या संपूर्ण कालावधी दरम्यान निविदेचा तपशिल व निविदा अर्ज करण्याची ऑनलाईन सुविधा याबाबत इंटरनेटद्वारे ऍक्सेस करण्यात कोणतीही अडचण येणार नाही, याबाबतची आवश्यक ती सर्व काळजी घेण्याचे आदेश महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागास देण्यात आले आहेत.
रस्त्यांच्या कामात दर्जा व गुणवत्ता जपली जावी, यासाठी रस्त्यांच्या कंत्राटांमध्ये गुणवत्ता नियंत्रण अभियंत्यांची नेमणूक करणे संबंधित कंत्राटदाराला बंधनकारक करण्यात आले आहे. कंत्राटदाराद्वारे नेमण्यात येणा-या संबंधित अभियंत्याकडे स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी (बी.ई., सिव्हील) असण्यासोबतच रस्ते बांधकामाचा किमान १० वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या अंतर्गत संबंधित कंत्राटाचे मूल्य रुपये २५ कोटी ते ५० कोटी पर्यंत असल्यास त्या कंत्राटासाठी एका गुणवत्ता नियंत्रण अभियंत्याची नेमणूक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कंत्राटाचे मूल्य ५० कोटी ते १०० कोटी रुपये इतके असल्यास त्यासाठी २ अभियंते तर त्यापुढील प्रत्येक ५० कोटींसाठी एका अतिरिक्त अभियंत्यांची नेमणूक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच संबंधित रस्त्यांच्या कामात गुणवत्तेबाबत / दर्जाबाबत काही उणीव आढळून आल्यास संबंधित कंत्राटदारासह गुणवत्ता नियंत्रण अभियंत्यास देखील जबाबदार धरुन त्यांच्यावर महापालिकेच्या संबंधित नियम व पध्दतीनुसार कारवाई केली जाईल.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages