Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

नमो कुस्ती महाकुंभात उसळला कुस्तीप्रेमीचा जनसागर


जामनेर - नाद कुस्तीचा, प्रण व्यसनमुक्तीचाचा जयघोष करत नमो कुस्ती महाकुंभात खानदेशातील लाखो प्रेक्षकांनी कुस्तीचा थरार याची देही अनुभवला. मुंगी शिरायलाही जागा नसलेल्या जामनेरमधल्या स्टेडियममध्ये सोलापूरचा सिकंदर शेख, सायगावचा विजय चौधरी आणि पंजाबच्या प्रीतपालच्या कुस्तीचा मनमुराद थरार कुस्तीप्रेमींना तब्बल सात तास घेतला.

कुस्तीच्या जनसागरात तब्बल ७ तास चाललेल्या या कुस्ती दंगलमध्ये सोलापूरचा सिकंदर शेखने जम्मू काश्मीरच्या बिनिया मिनला छडी टांग लावत अस्मान दाखविले. या कुस्तीसाठी पंच म्हणून स्वतः ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन हे होते. सायगावच्या विजय चौधरी विरुद्ध मुस्तफा खान या अटीतटीच्या लढतीत मुस्तफाला विजयने घुटना डावावर चितपट केले. यावेळी संपूर्ण स्टेडियममधील प्रेक्षकांनी उभे राहू आपल्या भागातील खेळाडूचा जयघोष केला. संपूर्ण स्टेडियममध्ये आतषबाजी करण्यात आली.

कुस्ती महाकुंभात प्रेक्षकांना एकापेक्षा एक लढतींचा थरार घेता आला. पंजाबच्या प्रितपालने दिल्लीच्या संती कुमारला भारली या डावावर अवघ्या २ मिनिटात चितपट केले. असाच जोरदार खेळ माऊली कोकाटेने करून दाखवला. त्याने उत्तर भारतातील तगडा पैलवान अजय गुज्जरला टांग डावावर चीतपट करून प्रेक्षकांची मने जिंकली.  प्रकाश बनकर वि. भूपिंदर सिंह ही कुस्ती बराच वेळ चालली त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांनी ही कुस्ती बरोबरीत सोडवली. हरयाणाच्या कृष्णकुमारने पंजाबच्या हॅप्पी सिंगला चितपट केले. बालारफिक शेखने पंजाबच्या मनप्रीतला पोकळ घिस्सा डावावर धूळ चारली.

माऊली जमदाडे आणि जतींदर सिंह यांच्यातील संघर्षही संपता संपत नव्हता. दोघेही तोडीस तोड असल्यामुळे ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. बाबर पैलवानवर मोनू खुराणाने मात केली.  सत्येन्द्र मलिकने काका जम्मूला चितपट केले. महाराष्ट्राच्या समीर शेखने कलवा गुज्जरला हरवले तर महेंद्र गायकवाडने मनजीत खत्रीला अस्मान दाखवले. कमलजित धुमचडीने गुरजन्नतला हरवण्याची किमया साधली.  विलास डोईफोडने प्रेक्षणीय संघर्षात प्रवीण भोलाला चितपट करून प्रेक्षकांची मने जिंकली. पंजाबच्या कमल कुमारने मध्यप्रदेशच्या रेहान खानला पराभूत केले.

या मैदानात १५० मल्लांनी आपल्या खेळाचे प्रदशर्न करून कुस्तीप्रेमींची मने जिंकली. या सर्व विजेत्या पैलवानांना मंत्री गिरीष महाजन यांनी १५ गदा, मानाचा  'नमो कुस्ती महाकुंभ' चा पट्टा आणि लाखोंचे बक्षिसे देऊन गौरविले. या मैदानासाठी पंच राजा पैलवान, सत्यदेव मलिक हे उपस्थित होते. हे मैदान पार पाडण्यासाठी संयोजक रोहित पटेल, विजय चौधरी, दत्तात्रय जाधव, वेंकटेश अहिरराव, दत्तू माळी, यशोदीप चौधरी यांनी काम पहिले.

या मैदासाठी ६ स्क्रीन व ५० हजार प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था तसेच खासबाग स्टेडियमसारखा आखाडा बांधण्यात आला होता. प्रत्येक प्रेक्षकाला बसून कुस्तीचा थरार अनुभवता यावा म्हणून महाजन यांनी भव्य स्टेडियमची निर्मिती केली होती. या कुस्ती मैदानासाठी माजी मंत्री सुरेश जैन, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण आणि जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

आयोजक मंत्री गिरीष महाजन हे शेवटच्या १ ते १० नंबरसाठी स्वतः पंच म्हणून मैदानात उभे होते. त्यांनी सर्व कुस्तीचे निकाल चोख  दिले. ज्या कुस्ती अटीतटीच्या झाल्या त्या कुस्त्या बरोबरीत सोडवून दोन्ही पैलवानाना समान बक्षिसे त्यांनी दिली. यावेळी पैलवान विजय चौधरी हे कुस्ती जिंकल्यानंतर त्यांनी  आयोजक गिरीष महाजन यांनाच खांद्यावर घेऊन आपला आनंद व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom