बार्टीमधून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबै बँकेचे ५ लाखापर्यंतचे शैक्षणिक कर्ज - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 May 2025

बार्टीमधून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबै बँकेचे ५ लाखापर्यंतचे शैक्षणिक कर्ज


मुंबई - बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) मधून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई जिल्हा बँक ५ लाखापर्यंत बिनव्याजी शैक्षणिक कर्ज देणार असल्याची घोषणा मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनी केली आहे. आज मुंबई बँकेच्या फोर्ट येथील मुख्य कार्यालयात बार्टीद्वारे प्रशिक्षण घेऊन (आयआयटी) (एनआयटी) मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मुंबई बँकेमार्फत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी भव्य कार्यशाळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आ. दरेकर बोलत होते. 

या कार्यक्रमाला मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, बार्टीचे संचालक सुनील वारे, कुणाल कांबळे, मुंबई बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक संदीप सुर्वे, नगरसेवक ईश्वर तायडे, पत्रकार उदय तानपाठक यांसह बार्टीतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी मार्गदर्शन करताना दरेकर म्हणाले की, मुंबई बँक शिक्षणासाठी, शिक्षणाच्या कर्जासाठी नेहमीच आग्रही राहिलीय. परंतु खऱ्या अर्थाने ज्या बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान, घटना दिली, आज आम्ही ज्यांच्यामुळे उभे आहोत, समाजातील मुले वेगवेगळ्या हुद्यावर बसून नावलौकिक कमावताहेत त्या समाजातील मुलांनी पुन्हा एकदा बाबासाहेबांचे जे शक्तीस्थान आहे ‘शिक्षण’ ती कमवावी व आपल्या कुटुंबाच्या भल्याबरोबर समाजाचे भले करावे, अशी अपेक्षा दरेकरांनी व्यक्त केली. 

ते पुढे म्हणाले की, माझ्यावर बाबासाहेबांच्या विचारांचा वेगळा पगडा आहे. जेव्हा समाजाचा विषय येतो त्यावेळी मी एक पाऊल पुढे टाकून मदतीसाठी सरसावतो. आपल्याला कर्जासाठी आम्हाला काय करता येईल यासंदर्भात हा कार्यक्रम आहे. जे आमच्या हातात आहे ते आम्ही तात्काळ करू. सरकारची मदत लागेल त्यासाठी शासन स्तरावर बैठक घेऊ. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला तर त्यांच्याकडेही बैठक घेऊ. या समाजातील मुलांना शिक्षणासाठी अत्यल्प व्याजदरात कर्ज कसे देता येईल याबाबत धोरण बनवू व बार्टीमधून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज देऊ,तसा निर्णय आमच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेऊ, असा विश्वासही दरेकर यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.

तसेच दरेकर पुढे म्हणाले की, विद्यार्थी या देशाचे भविष्य आहेत. विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी जेजे करता येईल ते करण्याचा आमचा प्रयत्न राहील. बार्टीला मुंबई बँकेकडून जेवढे सहकार्य लागेल तेवढे केले जाईल. शिक्षण,विद्वत्ता म्हटले की समोर नाव बाबासाहेबांचे येते. केवळ बाबासाहेबांची लेकरं म्हणून चालणार नाही तर त्यांनी जेजे आदर्श, विचार दिले आहेत त्या पावलावर पाऊल टाकून त्यांचे आदर्श घेतले तर आपण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही दरेकरांनी यावेळी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS