खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर बॉम्बस्फोटाची धमकी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 December 2025

खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर बॉम्बस्फोटाची धमकी


मुंबई - राज्यात एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरू असताना आणि दुसरीकडे नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच मुंबईत खळबळजनक घटना समोर आली आहे. शिवसेना (ठाकरे गट)चे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या कारवर बॉम्बस्फोटाची धमकी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

भांडूप नाहूर येथील संजय राऊत यांच्या ‘मैत्री’ बंगल्याबाहेर उभ्या असलेल्या एका कारच्या काचेवर “आज रात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार” असा धमकीचा मजकूर लिहिलेला आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि बॉम्बशोधक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित कारसह संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात येत असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राऊत यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. परिसरात पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला असून नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, बंगल्याबाहेर उभी असलेली कार नेमकी कोणाची आहे, ती तेथे कधीपासून उभी होती, याचा तपास सुरू आहे. तसेच कारवरील धमकीचा मजकूर कोणी आणि कधी लिहिला, हे शोधण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.

या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. प्राथमिक तपासानंतरच या धमकीमागील नेमका उद्देश स्पष्ट होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS