नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत विशेष अग्निसुरक्षा मोहीम, १३६ विरोधात कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 December 2025

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत विशेष अग्निसुरक्षा मोहीम, १३६ विरोधात कारवाई


मुंबई - नववर्ष स्वागत सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाने शहरात ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ राबवत मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. २२ ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत मुंबईतील २ हजार ७०३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून, अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १३६ आस्थापनांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. नववर्षाच्या निमित्ताने हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब, बार, पार्टी हॉल, रूफटॉप आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने अग्निसुरक्षेच्या दृष्टीने ही तपासणी करण्यात आली.

दरम्यान, ३० डिसेंबर २०२५ रोजी रात्री ‘जी दक्षिण’ विभागाने लोअर परळ येथील कमला मिल व शक्ती मिल परिसरात विशेष कारवाई करत १५ आस्थापनांची तपासणी केली. या कारवाईतून ८ अवैध व्यावसायिक एलपीजी सिलिंडर, २०० किलो कोळसा, १३५ लिटर खाद्यतेल, तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले.

या विशेष मोहिमेत तपासणी करण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये ३८ मॉल्स, ५१ पंचतारांकित हॉटेल्स, १९४ लॉजिंग-बोर्डिंग, ३७ रूफ टॉप आस्थापना, ३२५ पब, बार व क्लब, ३७ पार्टी हॉल, २८ जिमखाना, १९९३ रेस्टॉरंट्स यांचा समावेश आहे. यापैकी ५५ आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

विशेष मोहीम संपुष्टात आली असली तरी, मुंबई अग्निशमन दलाकडून नियमित तपासणी सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास ‘महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६’ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, नववर्ष स्वागत सोहळे साजरे करताना महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, तसेच नागरिकांनीही सतर्कतेने आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत नववर्ष साजरे करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS