
मुंबई - तब्बल साडेतीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबई महानगरपालिकेला ११ फेब्रुवारी रोजी नवा महापौर मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेतील सत्तास्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून महापौर, उपमहापौर आणि वैधानिक समिती अध्यक्षांसाठी नव्या वाहनांची खरेदी पूर्ण करण्यात आली आहे.
महापालिकेच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी पार पडल्या, तर १६ जानेवारीला निकाल जाहीर झाले. भाजप आणि शिंदे गटाकडे स्पष्ट बहुमत असले तरी महापौरपदाचा चेहरा अद्याप अधिकृत झाला नाही. मात्र, ११ फेब्रुवारी रोजी महापौर व उपमहापौरांची निवड होणार असून त्यानंतर स्थायी समितीसह शिक्षण, सुधार, बेस्ट आदी समित्यांचे अध्यक्ष निश्चित केले जाणार आहेत. पुढील टप्प्यात विशेष समित्या आणि १८ प्रभाग समित्यांच्याही निवडणुका होणार आहेत.
गेल्या पावणे चार वर्षांपासून महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने महापौर व समिती अध्यक्षांसाठीची वाहने प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वापरात होती. आता नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांसाठी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत वाहन खरेदीची प्रक्रिया राबवण्यात आली आहे.
यामध्ये महापौरांच्या दिमतीला इनोव्हा एन हायब्रीड वाहन देण्यात येणार असून ही गाडी पेट्रोल आणि इलेक्ट्रिक या दोन्ही प्रणालींवर चालणारी आहे. सध्या अशाच प्रकारच्या वाहनांचा वापर महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांकडून केला जातो. याशिवाय वैधानिक आणि विशेष समिती अध्यक्षांसाठी १२ नव्या स्कॉर्पिओ गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे.
महापौरांसाठी सुमारे ३० लाख रुपये किमतीची इनोव्हा हायब्रीड, तर समिती अध्यक्षांसाठी प्रत्येकी सुमारे १८ लाख रुपये किमतीच्या स्कॉर्पिओ गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे या सर्व वाहनांवर भगव्या रंगाचे विशेष पट्टे लावण्यात आले असून, त्यामुळे शहरात ही वाहने सहज ओळखता येणार आहेत. या भगव्या पट्ट्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
सत्तास्थापनेची औपचारिक घोषणा होण्याआधीच प्रशासन स्तरावर तयारी वेगाने सुरू असून, ११ फेब्रुवारीनंतर मुंबई महापालिकेच्या कारभाराला पूर्णवेळ लोकप्रतिनिधींचा चेहरा मिळणार आहे.

No comments:
Post a Comment