दादरमध्ये टॅक्सीचालकांची मुजोरी उघड; प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या ७ जणांना अटक, ४ टॅक्सी जप्त - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दादरमध्ये टॅक्सीचालकांची मुजोरी उघड; प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या ७ जणांना अटक, ४ टॅक्सी जप्त

Share This

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देश-विदेशातून दररोज हजारो प्रवासी येतात. कामानिमित्त, पर्यटनासाठी किंवा वैयक्तिक कारणांसाठी मुंबईत दाखल होणाऱ्या प्रवाशांना टॅक्सीचालकांकडून फसवणूक होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. अशाच प्रकारचा एक गंभीर प्रकार दादर परिसरात उघडकीस आला असून माटुंगा पोलिसांनी कारवाई करत दोन टॅक्सीचालकांसह एकूण ७ आरोपींना अटक केली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या ४ टॅक्सी जप्त करण्यात आल्या आहेत. (Mumbai crime news)

२४ ते २६ जानेवारीदरम्यान दादर रेल्वे स्टेशन (पूर्व) परिसरात दोन प्रवाशांची टॅक्सीचालक व त्यांच्या साथीदारांनी फसवणूक केल्याची घटना घडली. अवघ्या काही किलोमीटरच्या प्रवासासाठी प्रवाशांकडून अनुक्रमे १,८०० रुपये आणि २,००० रुपये आकारण्यात आले. मीटर बंद ठेवून जादा भाडे उकळल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त करत थेट पोलिसांत तक्रार दाखल केली.

तपासादरम्यान दादर ईस्ट परिसरात काही ठराविक टॅक्सीचालकांकडून अशा प्रकारची फसवणूक वारंवार होत असल्याची नोंद पोलिसांकडे असल्याचे समोर आले. परिवहन विभागाने कारवाईचे निर्देश दिले असतानाही अनेक ठिकाणी टॅक्सीचालकांची दादागिरी सुरूच असल्याचे वास्तव आहे. ठोस कारवाई अभावी प्रवाशांची लूट सुरू असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.

या प्रकरणात माटुंगा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी निष्पन्न केले. आरोपींकडून फसवणुकीची रक्कम जप्त करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेल्या चार टॅक्सीही ताब्यात घेण्यात आल्या आहेत. दोन टॅक्सीचालकांसह एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे.

मुंबईसारख्या महानगरात प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत चालला असून अशा कारवायांमुळे टॅक्सीचालकांच्या मनमानीला आळा बसेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages