BMC Election स्थायीला प्रभाकर शिंदे, शिक्षणला राजेश्री शिरवडकर; सुधारला संध्या दोशी तर बेस्टला तृष्णा विश्वासराव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 February 2026

BMC Election स्थायीला प्रभाकर शिंदे, शिक्षणला राजेश्री शिरवडकर; सुधारला संध्या दोशी तर बेस्टला तृष्णा विश्वासराव


मुंबई - मुंबई महापालिकेतील स्थायी, शिक्षण, सुधार आणि बेस्ट समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी महायुतीकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून, शुक्रवारी या पदांसाठी निवडणूक होणार आहे. महायुतीतर्फे विविध समित्यांसाठी अनुभवी नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे.

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी प्रभाकर शिंदे (भाजपा) यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी राजेश्री शिरवडकर (भाजपा), सुधार समितीसाठी संध्या दोशी (शिवसेना-शिंदे गट) तर बेस्ट समितीसाठी तृष्णा विश्वासराव (शिवसेना-शिंदे गट) यांचे अर्ज भरले आहेत.

प्रभाकर शिंदे : प्रदीर्घ राजकीय प्रवास - 
प्रभाकर शिंदे यांनी १९७३ साली शिवसैनिक म्हणून राजकारणात प्रवेश केला. १९८० मध्ये मुलुंड पूर्व शाखेचे उपशाखा प्रमुख, तर १९९२ मध्ये शाखाप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. १९९४ मध्ये भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष झाले.

१९९७ मध्ये मुलुंड पूर्वमधून प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आले. १९९८ मध्ये महापौर परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहिले. १९९९ आणि २००१ मध्ये बेस्ट समिती अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. २००२ मध्ये पुन्हा नगरसेवक म्हणून निवड झाली आणि २००२ ते २००६ या काळात महापालिका सभागृह नेते म्हणून कार्य केले. २००७ मध्ये तिसऱ्यांदा नगरसेवक झाले.

२०१७ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश करत चौथ्यांदा नगरसेवक झाले. २०१८ मध्ये चिपळूण-संगमेश्वर विधानसभा प्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडली. २०२० मध्ये भाजपा गटनेतेपदी निवड झाली. २०२६ मध्ये पाचव्यांदा नगरसेवक म्हणून निवडून येत त्यांनी आपला राजकीय प्रभाव कायम राखला आहे.

राजेश्री शिरवडकर : महिला नेतृत्वाचा ठसा 
राजेश्री शिरवडकर या भाजपच्या सक्रिय नेत्या असून शिक्षण आणि महिला-बाल कल्याण क्षेत्रात त्यांनी विशेष कामगिरी बजावली आहे. त्या अनेक वर्षे नगरसेविका म्हणून कार्यरत राहिल्या असून महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. सामाजिक उपक्रम, महिला सक्षमीकरण आणि शैक्षणिक प्रश्नांवर त्यांचा ठसा उमटला आहे.

महायुतीने चारही महत्त्वाच्या समित्यांसाठी अनुभवी व संघटनात्मक बळ असलेल्या उमेदवारांवर विश्वास दाखवला असून, शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीत कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS