आयटीआयच्या दोन लाख विद्यार्थ्यांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 February 2026

आयटीआयच्या दोन लाख विद्यार्थ्यांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण


मुंबई - कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातील दोन लाख आयटीआयच्या विद्यार्थ्यांना टप्याटप्याने आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मिळणार आहे. आपत्ती व्यवस्थापनाचा दीर्घ अनुभव असलेल्या ‘अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ आणि कौशल्य विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय यांच्यात आज यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सशक्त भारत घडवण्यासाठी देशवासियांसाठी विविध उपक्रम यशस्वीपणे राबवत आहेत. योग दिन, खेलो इंडिया याचाच हा भाग आहे. तर राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात कौशल्य विभागाकडून ही पारंपरिक खेळांचे महत्व नव्या पिढीला पटवून देण्यासाठी राज्यभरातील आयटीआयमध्ये क्रीडा महाकुंभ ही आयोजित करण्यात येतो. आता याच शृंखलेत जनसेवेच्या भावनेतून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम राबवून देशसेवेचे काम आयटीआय मध्ये होत असल्याचे प्रतिपादन कौशल्य विकास मंत्री  मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी केले.

कोणतीही आपत्ती ही सांगून येत नसते, आपत्ती मानव निर्मित असो किंवा नैसर्गिक असो, अशा वेळी मानवी सुरक्षेला प्राधान्य देऊन यामध्ये युवांचा सहभाग वाढवून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनला सहकार्य होण्यासाठी आपत्ती बचावकार्य करणारी यंत्रणा तयार करता येईल. आपत्तीचे व्यवस्थापन आणि बचावकार्य याचे प्रशिक्षण प्रत्येक नागरिकांनी घेतले पाहिजे,असेही मंत्री लोढा यांनी सांगितले.

‘अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ राज्यातील ४१९ शासकीय आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांना विना शुल्क प्रात्यक्षिकांसह आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणार असल्याचे अकादमीचे  मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मंत्री यांनी यावेळी सांगितले. मानवाने प्रगती केली असली तरी, आपत्तीचे स्वरूप ही त्यानुसार बदलले असून आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण नव्या पिढीला देण्याचा आमचा उद्देश असल्याचे व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेशमुख यांनी यावेळी सांगितले. तर शहरी आणि ग्रामीण भागातील विविध आपत्तीचा अभ्यास करून अकादमीने हा प्रशिक्षण कार्यक्रम तयार केला आहे. आपत्तीतील उपाययोजना आणि बचाव कार्य याचे प्रामुख्याने प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती अकादमीचे प्रतिनिधी हरीश महाजन यांनी दिली. यावेळी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनायाचे सह संचालक सतीश सूर्यवंशी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS