अपघातांमुळे बेस्टचे ५८ चालक बडतर्फ; ६०३ जणांवर निलंबनाची कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 March 2026

अपघातांमुळे बेस्टचे ५८ चालक बडतर्फ; ६०३ जणांवर निलंबनाची कारवाई


मुंबई - २०२२ ते २०२४ या कालावधीत रस्ते अपघातांमुळे बेस्ट आणि सेवा कंत्राटदार कंपन्यांच्या एकूण ५८ बस चालकांना बडतर्फ करण्यात आले असून ६०३ चालकांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली.

एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. अपघातांव्यतिरिक्त इतर कारणांमुळेही ६३ चालकांना बडतर्फ करण्यात आले, तर ५७४ चालकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

अपघातांची संख्या कमी करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने इलेक्ट्रिक बस चालकांसाठी प्रगत प्रशिक्षणाचा कालावधी वाढवला आहे. तसेच सुमारे २०० चालकांना बस ड्रायव्हिंग सिम्युलेटर प्रणालीद्वारे व्यावहारिक प्रशिक्षण देण्यात आले आहे.

वाहतूक आणि अभियांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली रस्त्यांवर बस चालकांच्या ड्रायव्हिंग पद्धतींची तपासणी केली जाते. बेपर्वाईने वाहन चालवताना आढळणाऱ्या चालकांवर तत्काळ कारवाई केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, बेस्ट बससेवेबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी मुंबईतील सर्व स्थानिक आमदारांसोबत बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली. मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि प्रवाशांची गरज लक्षात घेता शहरात किमान १० हजार बसांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

बेस्टच्या बससेवेबाबत आमदारासमवेत बैठक घेणार - माधुरी मिसाळ 
बेस्ट बससेवाबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी मुंबईतील सर्व स्थानिक आमदार यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल. या बैठकीस परिवहन विभागाचे अधिकारी यांनाही बोलवण्यात येईल, असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.याबाबत सदस्य सुनील शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य प्रवीण दरेकर, सचिन अहिर यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणल्या, मुंबईची लोकसंख्या आणि प्रवाशांची गरज लक्षात घेता शहरात किमान १० हजार बसची आवश्यकता आहे. यासाठी बेस्टने विविध कंत्राटदारांना ६,५५५ बस पुरवठ्यासाठी वर्क ऑर्डर दिल्या होत्या. मात्र कंत्राटदारांकडून बस वेळेत उपलब्ध होऊ न शकल्याने अपेक्षित प्रमाणात बससेवा वाढवता आली नाही. मार्च २०२३ पर्यंत १,३०० बस उपलब्ध होणे अपेक्षित होते, मात्र सध्या ६८५ बस उपलब्ध झाल्या आहेत. स्क्रॅपिंग पॉलिसीनुसार १५ वर्षांनंतर बस स्क्रॅप केल्या जात असल्याने बेस्टच्या मालकीच्या बसची संख्या कमी झाली आहे. पूर्वी बेस्टकडे १,८८२ मालकीच्या बस होत्या, मात्र सध्या ही संख्या २४९ इतकी राहिली आहे. उर्वरित बस भाडेतत्त्वावर घेतल्या असून सध्या २,५५८ भाडेतत्त्वावरील बस उपलब्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS