सायन रुग्णालयातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; फायर ऑडिट झाले तरी यंत्रणा कुचकामी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 April 2026

सायन रुग्णालयातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; फायर ऑडिट झाले तरी यंत्रणा कुचकामी


मुंबई - मुंबईतील लोकमान्य टिळक रुग्णालय (सायन हॉस्पिटल) येथील फायर सेफ्टी व्यवस्थेबाबत गंभीर त्रुटी उघडकीस आल्याने रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या भेटीदरम्यान ही बाब समोर आली.

गेल्या मंगळवारी दुपारी एक्स-रे विभागात एसीचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी त्यानंतर करण्यात आलेल्या पाहणीत फायर सेफ्टी यंत्रणेतील मोठ्या उणिवा उघड झाल्या.

रुग्णालयात लावलेले अनेक फायर एस्टिंगविशर एक्सपायर झाल्याचे तसेच त्यांची रिफिल मुदत दोन महिन्यांहून अधिक काळापासून संपलेली असल्याचे निदर्शनास आले. एस्टिंगविशरवरील स्टिकर्सवरूनच ही बाब स्पष्ट होत असून, आपत्कालीन परिस्थितीत ही यंत्रणा निष्क्रिय ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सायन रुग्णालयात दररोज सुमारे पाच हजार रुग्णांची ओपीडी असते. सकाळी ९ ते १२ या वेळेत एक्स-रे विभागात मोठी गर्दी होत असल्याने अशा दुर्घटनेच्या वेळी मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.

दरम्यान, महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये पाच वर्षांतून एकदा फायर ऑडिट केले जाते. सायन रुग्णालयाचे फायर ऑडिट २०२५ मध्ये करण्यात आले होते. तसेच केईएम रुग्णालयाचे ऑगस्ट २०२५ मध्ये, नायर रुग्णालयाचे जानेवारी २०२६ मध्ये, तर कुपर आणि ट्रॉमा रुग्णालयांचे २०२३-२४ दरम्यान ऑडिट झाले आहे. मात्र, ऑडिट होऊनही प्रत्यक्षात फायर सेफ्टी यंत्रणा अद्ययावत न ठेवल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने दुरुस्ती करून फायर सेफ्टी यंत्रणा कार्यक्षम करावी, अशी मागणी होत आहे. मुंबईकरांच्या जीवाशी संबंधित हा मुद्दा असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS