इबोला संदर्भात बीएमसीची सतर्कता; निवासी डॉक्टरांना मार्गदर्शक सूचना जारी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 May 2026

इबोला संदर्भात बीएमसीची सतर्कता; निवासी डॉक्टरांना मार्गदर्शक सूचना जारी


मुंबई - आफ्रिकेतील काही भागांमध्ये सुरू असलेल्या इबोला विषाणूच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर बीएमसी मार्डने मुंबईतील महानगरपालिका रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या उद्रेकाला Public Health Emergency of International Concern (PHEIC) घोषित केल्यानंतर ही खबरदारीची पावले उचलण्यात आली आहेत.

बीएमसी मार्डने स्पष्ट केले की, सध्याचा उद्रेक इबोला विषाणूच्या बुंडीबुग्यो प्रकाराशी संबंधित असून त्याचा प्रसार प्रामुख्याने काँगो आणि शेजारील युगांडा या भागांपुरता मर्यादित आहे. भारतात सध्या कोणताही इबोलाचा उद्रेक किंवा समुदाय स्तरावरील प्रसार नोंदवलेला नसल्याने नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचेही सांगण्यात आले.

तथापि, आरोग्यसेवा कर्मचारी म्हणून सजगता आणि प्रतिबंधात्मक तयारी अत्यंत महत्त्वाची असल्याचे बीएमसी मार्डने नमूद केले आहे. कोविडसह विविध आरोग्य आपत्कालीन परिस्थितींमध्ये निवासी डॉक्टरांनी फ्रंटलाइन हेल्थकेअर वर्कर्स म्हणून जबाबदारीने काम केले असून, भविष्यातही आवश्यकतेनुसार सार्वजनिक आरोग्य यंत्रणांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मार्गदर्शक सूचनांमध्ये निवासी डॉक्टरांना मानक संसर्ग नियंत्रण पद्धतींचे पालन करणे, हात स्वच्छता राखणे, सार्वत्रिक प्रतिबंधक उपायांचा अवलंब करणे तसेच बायोमेडिकल कचरा व्यवस्थापन नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

इबोला हा संक्रमित व्यक्तीच्या रक्त, शारीरिक स्त्राव किंवा दूषित वस्तूंशी थेट संपर्कातून पसरतो. हा संसर्ग सामान्य परिस्थितीत हवेतून पसरत नसून कोविड-१९ इतका सहज संसर्गजन्य नाही, असेही बीएमसी मार्डने स्पष्ट केले.

सार्वजनिक आरोग्य सुरक्षेसाठी जागरूकता, तयारी आणि जबाबदार आरोग्य सेवा पद्धती अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे बीएमसी मार्डने अधोरेखित केले आहे.

रुग्णहितासाठी कटिबद्ध - 
निवासी डॉक्टरांनी नेहमीच फ्रंटलाइन हेल्थकेअर वर्कर्स म्हणून रुग्णसेवा आणि सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी समर्पितपणे काम केले आहे. या मार्गदर्शक सूचनेद्वारे बीएमसी मार्ड चा उद्देश इबोला संबंधित कोणत्याही अनावश्यक घबराटीला बळी न पडता जनजागृती, सज्जता आणि जबाबदार आरोग्य सेवा पद्धतींना प्रोत्साहन देणे हा आहे. रुग्णहितासाठी आम्ही रुग्णालय प्रशासन आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणांसोबत पूर्ण सहकार्य करण्यास कटिबद्ध आहोत.

 -डॉ. अमर अगमे 
महासचिव, मुंबई महानगरपालिका मार्ड

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS