पंतनगर मनपा शाळा क्र. 2 च्या जागेबाबत नगरसेविका राखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 May 2026

पंतनगर मनपा शाळा क्र. 2 च्या जागेबाबत नगरसेविका राखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश आंदोलन


मुंबई - घाटकोपर पूर्व येथील पंतनगर परिसरातील मनपा मराठी शाळा क्र. 2 ची मौल्यवान सार्वजनिक जागा खाजगी संस्थेला देण्याच्या प्रस्तावाविरोधात स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या निर्णयाविरोधात नगरसेविका राखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.

नागरिकांच्या मते, पंतनगर मनपा शाळा क्र. 2 ची जागा निर्मल एज्युकेशन सोसायटी या खाजगी संस्थेला देण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू असून, सार्वजनिक मालमत्तेचे खासगीकरण करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या निर्णयामुळे स्थानिक विद्यार्थ्यांचे आणि नागरिकांचे हित धोक्यात येणार असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली.

यावेळी बोलताना नगरसेविका राखी जाधव यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली ही जागा खाजगी संस्थेकडे देण्याऐवजी परिसरातील नागरिकांच्या गरजांसाठी वापरण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

राखी जाधव यांनी या जागेवर सीबीएसई शाळा किंवा ज्युनिअर कॉलेज सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच नागरिकांसाठी आधुनिक सुविधा केंद्र आणि आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी अग्निशमन केंद्र उभारण्यात यावे, अशीही त्यांची भूमिका आहे.

"ही जागा जनतेची असून तिचा उपयोगही जनतेच्या हितासाठीच झाला पाहिजे. प्रशासनाने तातडीने या निर्णयाचा फेरविचार करून सार्वजनिक हिताला प्राधान्य द्यावे," असे राखी जाधव यांनी आंदोलनादरम्यान स्पष्ट केले.

दरम्यान, या विषयावर प्रशासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS