मुंबईच्या महापौरांना बॉम्बस्फोटाची धमकी; धमक्यांना न घाबरता जनतेची सेवा सुरूच राहणार – रितू तावडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 June 2026

मुंबईच्या महापौरांना बॉम्बस्फोटाची धमकी; धमक्यांना न घाबरता जनतेची सेवा सुरूच राहणार – रितू तावडे


मुंबई - मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या धमकीच्या ई-मेलमध्ये महापौरांचे वाहन, महापौर कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय (CM Office), मुंबई महानगरपालिका (BMC) कार्यालये तसेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) परिसरात स्फोट घडवून आणण्याचा इशारा देण्यात आला होता.

धमकीचा ई-मेल आज सकाळी सुमारे ९:२० वाजता प्राप्त झाला. ई-मेलमध्ये विविध ठिकाणी आयईडी (IED) स्फोट घडवून आणण्याचा उल्लेख करण्यात आला असून काही आक्षेपार्ह आणि भडकाऊ मजकूरही नमूद करण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने आणि त्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. सुरक्षा यंत्रणांनी संबंधित ठिकाणांची तपासणी करत धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सायबर आणि गुन्हे शाखेची मदत घेतली आहे.

दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही. मुंबईकरांच्या हितासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी माझे काम नियमितपणे सुरू राहील."

महापौरांनी सांगितले की, धमकीची माहिती मिळाल्यानंतरही पूर्वनियोजित महत्त्वाच्या बैठका आणि जनतेची कामे खोळंबू नयेत यासाठी त्या नियोजित वेळेनुसार महानगरपालिका मुख्यालयात उपस्थित राहिल्या आणि सर्व बैठका पार पाडल्या.

त्या म्हणाल्या, "माझ्यासाठी कर्तव्याला नेहमीच पहिले प्राधान्य आहे आणि राहील. अशा गंभीर प्रकरणांमध्ये पोलीस आणि महानगरपालिका प्रशासन योग्य ती कायदेशीर कारवाई करत असून माझ्या सुरक्षेबाबत आवश्यक ती सर्व उपाययोजना केल्या जातील, याचा मला पूर्ण विश्वास आहे."

महापौरांनी यापूर्वी बांगलादेशी फेरीवाले आणि इतर अनधिकृत प्रकरणांवर कारवाई करताना काही घटकांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचा उल्लेख करत, "मी कधीही दबावासमोर झुकले नाही आणि यापुढेही झुकणार नाही," असे ठामपणे सांगितले.

तसेच राज्यातील इतर काही शहरांच्या महापौरांनाही अशाच प्रकारच्या धमक्या आल्याची माहिती असल्याचे सांगून त्यांनी हे एखाद्या मोठ्या कटकारस्थानाचा भाग असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे म्हटले. मात्र राज्याच्या गृह खात्यावर आणि तपास यंत्रणांवर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, धमकीचा ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी व्यापक तपास सुरू केला असून ई-मेलचा स्रोत, आयपी अ‍ॅड्रेस आणि संबंधित डिजिटल पुराव्यांचा मागोवा घेतला जात आहे.

"प्रशासन आणि पोलीस यंत्रणा आपले काम करत आहे आणि मी माझे जनसेवेचे व्रत सुरूच ठेवेन. अशा धमक्यांमुळे मुंबईच्या विकासाचा आणि सुरक्षेचा वेग मंदावणार नाही," असे महापौर रितू तावडे यांनी शेवटी ठामपणे सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS