
मुंबई - वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट (NEET) परीक्षेला बसणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट उपक्रमाने विशेष तयारी केली आहे. परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना वेळेत आणि सुरक्षितपणे परीक्षा केंद्रांवर पोहोचविण्यासाठी शहरातील २४ विशेष मार्गांवर ६० अतिरिक्त बस सोडण्यात येणार असून तब्बल १८० फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवरही विद्यार्थ्यांच्या भवितव्याला प्राधान्य देत ही विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचण्याची चिंता असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बेस्ट प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कुर्ला, दादर, मलाड, मुलुंड आदी प्रमुख रेल्वे स्थानकांमधून विविध परीक्षा केंद्रांपर्यंत विशेष बससेवा चालविण्यात येणार आहे. परीक्षेच्या दिवशी होणारी गर्दी, वाहतूक कोंडी आणि प्रवासातील संभाव्य अडचणी लक्षात घेऊन ही व्यवस्था करण्यात आली आहे.
मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहणार असल्याने या विशेष बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करून परीक्षा केंद्रांवर वेळेपूर्वी पोहोचावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या हितासाठी पुढाकार घेतल्याची भावना यानिमित्ताने व्यक्त होत आहे.


No comments:
Post a Comment