केईएम हॉस्पिटलमध्ये एचपीव्ही लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; २८२ जणांचे लसीकरण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 June 2026

केईएम हॉस्पिटलमध्ये एचपीव्ही लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; २८२ जणांचे लसीकरण



मुंबई - सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल येथे केईएम मार्डच्या वतीने आयोजित करण्यात आलेली दुसरी एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या पार पडली. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि इतर एचपीव्ही-संबंधित कर्करोगांपासून संरक्षण मिळावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण २८२ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.

कम्युनिटी मेडिसिन, प्रसूती व स्त्रीरोग आणि भूलशास्त्र विभागांच्या सहकार्याने तसेच रोटरी क्लब ऑफ मुंबई मुलुंड ईस्ट यांच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात आली. निवासी डॉक्टर, एमबीबीएस विद्यार्थी, ओटी, फिजिओथेरपी आणि नर्सिंग विद्यार्थी, इंटर्न, स्टाफ नर्सेस तसेच प्राध्यापकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.

मोहिमेदरम्यान भारतात विकसित करण्यात आलेली स्वदेशी, जेंडर-न्यूट्रल आणि क्वाड्रिव्हॅलेंट CERVAVAC ही एचपीव्ही लस देण्यात आली. यापैकी १३१ जणांना पहिला डोस देण्यात आला, तर इतर लाभार्थ्यांना नियोजित वेळापत्रकानुसार पुढील डोस देण्यात आले. विशेष म्हणजे, २४ पुरुष लाभार्थ्यांनीही लसीकरण करून घेतले, ज्यामुळे एचपीव्ही लसीकरणाबाबत पुरुषांमध्येही जागरूकता वाढत असल्याचे दिसून आले.

यापूर्वी झालेल्या पहिल्या मोहिमेत २०६ जणांचे लसीकरण करण्यात आले होते. दुसऱ्या मोहिमेला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामागे रोटरी क्लब ऑफ मुंबई मुलुंड ईस्ट यांचे महत्त्वपूर्ण योगदान असून त्यांनी लसीच्या किमतीवर ५० टक्के अनुदान दिल्याने लसीकरण अधिक परवडणारे झाले.

या उपक्रमाला प्रोत्साहन दिल्याबद्दल केईएम मार्डने अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक यांचे आभार मानले आहेत. तसेच पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन प्रोत्साहन देण्यात आले.

एचपीव्ही संसर्गामुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, गुदद्वार, पुरुष जननेंद्रिय, योनी आणि घशाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा भाग म्हणून एचपीव्ही लसीकरणाला विशेष महत्त्व असून, अशा मोहिमांद्वारे कर्करोगाचा वाढता भार कमी करण्यासाठी केईएम मार्ड सातत्याने प्रयत्नशील असल्याचे अध्यक्ष डॉ. शुभम सोळंके यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS