
मुंबई / JPN NEWS -
मुंबई महानगरपालिकेच्या जल विभागातील कथित लाचखोरीच्या प्रकरणात एसीबीच्या कारवाईनंतर अंधेरी पश्चिम विभागातील पर्यवेक्षक विनोद राठौड फरार झाला आहे. नळ कनेक्शन पुन्हा जोडण्यासाठी तब्बल ₹1 लाख 80 हजार रुपयांची लाच मागितल्याच्या तक्रारीनंतर एसीबीने सापळा रचत निरीक्षक नंदन मोरे याला ₹40 हजारांची पहिली हप्ता स्वीकारताना अटक केली. मात्र, या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेला राठौड कारवाईची चाहूल लागताच पसार झाल्याचे समोर आले आहे.
अंधेरी पश्चिम परिसरातील एका दुकानाचे पाणी बिल जमा न झाल्याने नळ कनेक्शन तोडण्यात आले होते. कनेक्शन पुन्हा जोडण्यासाठी संबंधित दुकानदाराकडून पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. तक्रारदाराकडे ₹1.80 लाखांची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर तक्रार एसीबीकडे करण्यात आली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे ₹40 हजारांची रक्कम स्वीकारताना निरीक्षक नंदन मोरे याला रंगेहाथ पकडण्यात आले. चौकशीदरम्यान ही रक्कम पश्चिम विभागातील पर्यवेक्षक विनोद राठौड यांच्या सांगण्यावरून स्वीकारल्याचे समोर आल्याने राठौड यालाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.
एसीबीच्या हाती लागण्यापूर्वीच पसार -
एसीबीच्या कारवाईनंतर विनोद राठौड फरार झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणेकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याच्या संभाव्य ठिकाणांवर शोध घेतला जात असून, लवकरच त्याला अटक केली जाईल, अशी माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, नळ जोडणीसारख्या मूलभूत नागरी सुविधेसाठी लाखो रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपामुळे मनपाच्या जल विभागातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच यापूर्वी अशाच प्रकारे नागरिकांकडून पैशांची मागणी करण्यात आली होती का, याचाही तपास एसीबीकडून केला जाण्याची शक्यता आहे.


No comments:
Post a Comment