
मुंबई | जेपीएन न्यूज - मुंबईसह जलसंकलन क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मंगळवार (21 जुलै) सकाळी 6 ते बुधवार (22 जुलै) सकाळी 6 या 24 तासांत झालेल्या पावसानंतर सातही जलाशयांतील एकूण पाणीसाठा 61.90 टक्क्यांवर पोहोचला असून, गेल्या 24 तासांत त्यात 4.15 टक्क्यांची वाढ झाली आहे.
मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सातही तलावांमध्ये सध्या 8 लाख 95 हजार 907 दशलक्ष लिटर (ML) इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. ही एकूण जलसाठा क्षमतेच्या 61.90 टक्के आहे.
दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख जलाशयांपैकी तानसा तलाव आज (22 जुलै) सकाळी सुमारे 8.51 वाजता ओसंडून वाहू लागला. वाढत्या पाण्याचा विसर्ग करण्यासाठी तानसा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. तानसा तलावाची कमाल जलधारण क्षमता 14,508 कोटी लिटर इतकी आहे.
याआधी विहार तलाव 7 जुलै रोजी रात्री 9 वाजता, तर तुळशी तलाव 7 जुलै रोजी रात्री 11.43 वाजता ओसंडून वाहू लागले होते. आता तानसा तलावही भरल्याने मुंबईच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
सध्याच्या आकडेवारीनुसार मोडकसागर तलाव 90.12 टक्के, तानसा 97.96 टक्के, मध्य वैतरणा 53.01 टक्के, भातसा 57.27 टक्के, तर विहार आणि तुळशी तलाव 100 टक्के भरले आहेत. अप्पर वैतरणा तलावात अद्याप 39.04 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवस मुंबई आणि जलसंकलन क्षेत्रात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, त्यामुळे जलाशयांतील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.


No comments:
Post a Comment