11 दिवसांत मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवरून 2,499 मेट्रिक टन कचरा हटवला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 July 2026

11 दिवसांत मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवरून 2,499 मेट्रिक टन कचरा हटवला


मुंबई | जेपीएन न्यूज - मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने 9 ते 19 जुलै 2026 या कालावधीत विशेष स्वच्छता मोहीम राबवून 2,498.66 मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन केले. भरती-ओहोटीमुळे समुद्रकिनाऱ्यांवर वाहून आलेला प्लास्टिक, थर्माकोल, लाकडी अवशेष, जलवनस्पती आणि इतर घनकचरा हटवून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.

महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. 14 ते 18 जुलैदरम्यान समुद्राला 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती येण्याचा अंदाज लक्षात घेऊन विशेष नियोजन करण्यात आले होते.

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागानुसार, जुहू समुद्रकिनाऱ्यावरून सर्वाधिक 1,825 मेट्रिक टन कचरा हटविण्यात आला. याशिवाय वेसावे समुद्रकिनाऱ्यावरून 277.60 मेट्रिक टन, दादर-माहीम किनाऱ्यावरून 152.10 मेट्रिक टन, चिंबई-वारिंगपाडा किनाऱ्यावरून 127.20 मेट्रिक टन, मढ-मार्वे किनाऱ्यावरून 44.28 मेट्रिक टन, गोराई किनाऱ्यावरून 38.82 मेट्रिक टन आणि गिरगाव चौपाटीवरून 33.66 मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला.

उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी सांगितले की, मान्सून काळात समुद्रातून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, थर्माकोल, लाकडी अवशेष आणि इतर कचरा किनाऱ्यावर वाहून येतो. तो तातडीने हटविण्यासाठी विशेष स्वच्छता पथके, यंत्रसामग्री, वाहने आणि मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते.

महापालिकेने नागरिकांनाही समुद्रकिनारे स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, किनाऱ्यांवर कचरा टाकू नये आणि स्वच्छता राखण्यास हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS