मुंबईला ‘रेबीजमुक्त’ करण्यासाठी BMCचा मोठा निर्णय; Mission Rabies India सोबत 3 वर्षांचा करार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 July 2026

मुंबईला ‘रेबीजमुक्त’ करण्यासाठी BMCचा मोठा निर्णय; Mission Rabies India सोबत 3 वर्षांचा करार


मुंबई / जेपीएन न्यूज - मुंबईतील भटके कुत्रे आणि मांजरी यांच्यामुळे होणाऱ्या रेबीजचा धोका कमी करून ‘रेबीजमुक्त मुंबई’ घडविण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि Worldwide Veterinary Services-HOPE/Mission Rabies India (WVS-HOPE/Mission Rabies India) यांच्यात गुरुवारी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या कराराअंतर्गत मुंबईतील भटक्या कुत्र्यांचे मोफत रेबीज लसीकरण करण्यात येणार आहे.

महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी उप आयुक्त (विशेष) विनायक विसपुते, देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण तसेच Mission Rabies Indiaचे संचालक आणि WVS-HOPEचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बालाजी चंद्रशेखर उपस्थित होते.

प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी सांगितले की, केंद्र सरकारने वर्ष 2030 पर्यंत श्वानांमुळे होणाऱ्या रेबीजचे निर्मूलन करण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा तयार केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने भटक्या श्वानांचे लसीकरण आणि रेबीज प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे.

याच पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली BMCने 2026 ते 2028 या तीन वर्षांसाठी Mission Rabies India सोबत करार केला आहे. या कालावधीत शहरभर मोठ्या प्रमाणावर भटक्या कुत्र्यांचे रेबीज लसीकरण (Mass Dog Vaccination), रेबीजबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा प्रसार आणि रेबीज सर्व्हिलन्स कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे मुंबईत रेबीज प्रतिबंधाला बळ मिळण्याबरोबरच नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण आणि भटक्या प्राण्यांमधील रेबीज नियंत्रणाला गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS