
मुंबई | जेपीएन न्यूज - दि. 23 : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी केला. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर म्हणाले की, केवळ ४८ तासांच्या आवाहनानंतरही मुंबई, पुणे, नागपूर, नांदेड, लातूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, जळगाव, नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी, सामाजिक संघटनांनी तसेच विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर प्रथमच राज्यव्यापी बंदला जनतेने मोठा पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले.
जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत केंद्र सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, अशी मागणी त्यांनी केली. विद्यार्थ्यांच्या सोशल मीडिया खात्यांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करत लोकशाही मार्गाने प्रश्न सोडवण्याचे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्र बंद शांततेत पार पडल्याचा दावा करत अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे दुकानांची तोडफोड झाल्याची एक घटना वगळता अन्य कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे त्यांनी सांगितले. पुढील आंदोलनाची दिशा जंतर-मंतरवरील आंदोलनकर्ते, विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांशी चर्चा करून निश्चित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पेपरफुटीच्या घटनांमुळे शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात आली असून, केंद्र सरकारने परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी ठोस आराखडा जाहीर करावा, अशी मागणी आंबेडकर यांनी केली. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी पुन्हा केली.
२६ जुलै रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याबाबत विचारले असता, अद्याप कोणतेही निमंत्रण मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर कोणताही पक्ष आंदोलन करत असेल तर त्याला विरोध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संविधानातील कलम १४ आणि २१ च्या अंमलबजावणीबाबत सर्वोच्च न्यायालयाने अधिक सक्रिय भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही आंबेडकर यांनी व्यक्त केली. शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि गुणवत्तेचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.


No comments:
Post a Comment