
मुंबई | जेपीएन न्यूज - देशातील सहकार तत्त्वावर आधारित पहिल्या ‘भारत टॅक्सी’ (Bharat Taxi) कॅब आणि वाहन सेवा उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री तथा नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आयोजित विशेष कार्यक्रमात या सेवेचा शुभारंभ झाला. मोबाईल ॲपच्या माध्यमातून दुचाकी, ऑटो-रिक्षा आणि चारचाकी वाहनांची सेवा या उपक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर आणि सहकार टॅक्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कर्नल हिमांशू सिंह यांनी कराराच्या प्रतींची देवाणघेवाण केली.
या करारानुसार, मुंबईतील प्रवाशांना रेल्वे, मेट्रो आणि बस स्थानकांपासून अंतिम टप्प्यापर्यंत (Last-Mile Connectivity) सहज प्रवास करता यावा यासाठी महानगरपालिकेच्या अखत्यारीतील जागांचा वापर आणि वाहतूक नियोजनामध्ये समन्वय साधला जाणार आहे.
कार्यक्रमाला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार महेश बालदी, प्रशांत ठाकूर, मंदा म्हात्रे, सहकार सचिव प्रवीण दराडे, केंद्रीय सहकार मंत्रालयाचे संयुक्त सचिव रमण कुमार, सहकार आयुक्त दीपक तावरे, सहकार टॅक्सीचे अध्यक्ष डॉ. जयेन मेहता तसेच ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


No comments:
Post a Comment