
मुंबई | जेपीएन न्यूज -
देशभरात गाजत असलेल्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाचे पडसाद गुरुवारी मुंबई महापालिकेच्या सभागृहात उमटले. सभागृहाचे कामकाज सुरू होताच काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले. ‘मोदी हाय हाय’, ‘विद्यार्थ्यांना न्याय द्या’, ‘पेपरफुटी बंद करा’ अशा घोषणांनी सभागृहात काही काळ गदारोळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, या गोंधळातही महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजित कामकाज पूर्ण करण्यात आले.
नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी बॅनर झळकावत केंद्र सरकारवर टीका केली. ‘चोर है, चोर है, मोदी सरकार चोर है’, ‘विद्यार्थ्यांना न्याय द्या’, ‘वंदे मातरम्’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा विविध घोषणा देत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. विशेष म्हणजे, यावेळी भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नगरसेवकांनी कोणतीही प्रतिघोषणाबाजी न करता संयमाची भूमिका घेतली.
सुमारे अर्धा तास सभागृहात गोंधळ सुरू असतानाही महापौर रितू तावडे यांनी विविध प्रशासकीय विषयांवरील प्रस्ताव मांडून त्यांना मंजुरी दिली. नामकरणाच्या प्रस्तावांसह इतर महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यात आले. महापौरांनी दोन वेळा विरोधकांना शांततेचे आवाहन केले, मात्र त्याचा विशेष परिणाम झाला नाही.
शोकप्रस्तावावेळी विरोधक शांत -
माजी नगरसेवक कुशल शर्मा यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला. त्यावेळी महापौरांनी किमान शोकप्रस्तावाच्या वेळी शांतता राखण्याचे आवाहन केल्यानंतर विरोधी पक्षाचे नगरसेवक आपल्या जागेवर बसले. त्यामुळे अर्ध्या तासाहून अधिक काळ सुरू असलेला गोंधळ काही काळासाठी थांबला आणि सभागृहात शांतता निर्माण झाली.
सभागृहाबाहेरही सत्ताधारी-विरोधक आमनेसामने -
सभागृहाचे कामकाज संपल्यानंतरही राजकीय वातावरण तापलेलेच राहिले. विरोधी पक्षाचे नगरसेवक पक्ष कार्यालयाकडे जात असताना सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक समोर आले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी पुन्हा घोषणाबाजी सुरू झाली. कोणतीही बाजू माघार घेण्यास तयार नसल्याने सभागृहाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले.
सायंकाळी साडेचारच्या सुमारास सभागृह संपल्यानंतर जवळपास पावणेसात वाजेपर्यंत दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू होती. विरोधकांनी सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केल्याने सत्ताधारी पक्षाचे नगरसेवकही तेथेच थांबले. अखेर वरिष्ठ सदस्यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही बाजूंमध्ये शांततापूर्ण चर्चा झाली आणि तणाव निवळला.


No comments:
Post a Comment