
मुंबई | जेपीएन न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास आणि उद्योजकतेचा संकल्प अधिक दृढ करण्यात येत असल्याचे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. उद्योगांच्या गरजेनुसार कुशल आणि रोजगारक्षम मनुष्यबळ तयार करण्यासाठी विभाग सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री लोढा म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने उद्योग, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा विकासात देशात आघाडी घेतली आहे. दावोस येथे झालेल्या 15.70 लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांमुळे सुमारे 15.95 लाख रोजगारनिर्मितीचा मार्ग मोकळा झाला असून या संधींचा लाभ राज्यातील युवकांना मिळावा, यासाठी कौशल्य विकास विभाग विशेष प्रयत्न करत आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2024 ते जून 2026 या कालावधीत विभागाने 1,619 रोजगार मेळावे आयोजित करून 85,834 युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला. तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 1,38,635 युवकांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यासाठी 897.65 कोटी रुपयांचे विद्यावेतन वितरित करण्यात आले आहे.
राज्यातील 2,507 कौशल्य प्रशिक्षण केंद्रांमध्ये 3.84 लाखांहून अधिक युवक प्रशिक्षण घेत आहेत, तर राष्ट्रीय अप्रेंटिसशिप योजनांद्वारे 1.71 लाखांहून अधिक उमेदवार रोजगारक्षम झाले आहेत. याशिवाय राज्यातील आयटीआयमधून दरवर्षी सुमारे 1.5 लाख कुशल युवक उद्योग क्षेत्रासाठी तयार होत असल्याचे लोढा यांनी सांगितले.
चालू आर्थिक वर्षात कौशल्य विकास केंद्रे, अप्रेंटिसशिप, अल्पकालीन अभ्यासक्रम आणि आयटीआयच्या माध्यमातून सुमारे 7.5 लाख उमेदवार रोजगारक्षम झाल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्यात 36 स्टार्टअप केंद्रे, मुख्यमंत्री महाफंड आणि स्वयंरोजगार प्रोत्साहनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टपूर्तीसाठी रोजगाराभिमुख विकासाची दिशा अधिक मजबूत करण्याचा संकल्प विभागाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा व्यक्त केला असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.


No comments:
Post a Comment