
मुंबई | जेपीएन न्यूज - दि. 23 जुलै :
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी मोडक सागर तलाव गुरुवारी पहाटे 2.07 वाजता ओसंडून वाहू लागला. तलावाचा एक दरवाजा उघडण्यात आला असून, सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तलावाची पातळी कमाल क्षमतेपर्यंत पोहोचल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने दिली.
यासह मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातपैकी चार तलाव यंदाच्या पावसाळ्यात भरून वाहू लागले आहेत. यापूर्वी विहार आणि तुळशी तलाव 7 जुलै रोजी, तर तानसा तलाव 22 जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता.
सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये मिळून 10,09,432 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असून, तो एकूण क्षमतेच्या 69.74 टक्के इतका आहे. सातही तलावांची एकत्रित कमाल साठवण क्षमता 14,47,363 दशलक्ष लिटर आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात वैतरणा नदीवर उभारलेला मोडक सागर प्रकल्प हा मुंबईच्या पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा स्रोत असून, शहराच्या एकूण पाणीपुरवठ्यात त्याचे 11.22 टक्के योगदान आहे. या प्रकल्पाचे बांधकाम 1954 मध्ये पूर्ण झाले असून त्याचे व्यवस्थापन बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे उर्वरित तलावांतील पाणीसाठाही वेगाने वाढत असून, आगामी काही दिवसांत आणखी तलाव भरून वाहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


No comments:
Post a Comment