10 वर्षांत 152 पेक्षा अधिक पेपर लीक; 7.5 कोटी विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात - राहुल गांधी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 July 2026

10 वर्षांत 152 पेक्षा अधिक पेपर लीक; 7.5 कोटी विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात - राहुल गांधी


नवी दिल्ली | जेपीएन न्यूज - लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणावर आणि स्पर्धा परीक्षा व्यवस्थेवर जोरदार टीका केली. गेल्या दहा वर्षांत देशभरात 152 हून अधिक पेपर लीक झाल्याचा दावा करत, त्यामुळे सुमारे 7.5 कोटी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांच्या भविष्यावर परिणाम झाल्याचे ते म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रमाणावर पेपर लीक होऊनही गेल्या दहा वर्षांत एकाही दोषीला कठोर शिक्षा झालेली नाही. लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे 8 ते 10 तास अभ्यास करून परीक्षेची तयारी करतात, मात्र 40 ते 50 लाख रुपये मोजणाऱ्यांना मागच्या दाराने संधी मिळत असल्याने प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे, असा आरोप त्यांनी केला.

पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या मांडल्या. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, विद्यार्थ्यांवर कथित अमानुष कारवाई करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची सार्वजनिक माफी मागावी, अशी त्यांची मागणी होती.

विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, "विद्यार्थी दहशतवादी नाहीत. त्यांच्यावर पेलेट गन चालविण्यात आल्या," असा आरोप त्यांनी केला.

शिक्षणावरील खर्चाचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी म्हणाले की, केंद्र सरकारचे शिक्षण बजेट 1.4 लाख कोटी रुपये आहे, तर देशातील कुटुंबे NEET परीक्षेच्या तयारीवर सुमारे 1.32 लाख कोटी रुपये खर्च करतात. त्यामुळे शिक्षण व्यवस्था मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांसाठी दिवसेंदिवस महाग होत असल्याचा दावा त्यांनी केला.

रोजगाराच्या प्रश्नावरही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. चिनी वस्तूंच्या वाढत्या आयातीमुळे, लघुउद्योगांसमोरील अडचणींमुळे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे रोजगाराच्या संधी कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बँकांचे कर्ज आणि आर्थिक मदत केवळ मोजक्या मोठ्या उद्योगसमूहांनाच मिळत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS