इस्त्रायलमध्ये नोकरीसाठी निवडलेल्या महाराष्ट्रातील १०६ उमेदवारांना इस्त्रायली मानकांनुसार निवासी प्रशिक्षण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 July 2026

इस्त्रायलमध्ये नोकरीसाठी निवडलेल्या महाराष्ट्रातील १०६ उमेदवारांना इस्त्रायली मानकांनुसार निवासी प्रशिक्षण


मुंबई | जेपीएन न्यूज - 
राज्यातील युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. इस्त्रायलमध्ये रोजगारासाठी निवड झालेल्या पहिल्या टप्प्यातील १०६ उमेदवारांना इस्त्रायली मानकांनुसार (Israeli Standards) पाच दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. हे प्रशिक्षण २७ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), औंध, पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या या प्रशिक्षणाचा उद्देश उमेदवारांना इस्त्रायलमधील कामकाजाची पद्धत, गुणवत्ता निकष, सुरक्षा मानके आणि व्यावसायिक कार्यसंस्कृतीची ओळख करून देणे हा आहे. यामध्ये सेवा क्षेत्रातील रोजगारासाठी निवड झालेल्या उमेदवारांचा समावेश असून, त्यांना आधुनिक कामकाज पद्धती, कार्यस्थळी सुरक्षितता, गुणवत्ता नियंत्रण, व्यावसायिक शिस्त आणि परदेशातील रोजगारासाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या निवासी प्रशिक्षणामुळे उमेदवारांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. तसेच इस्त्रायलमधील नियोक्त्यांच्या अपेक्षांनुसार काम करण्याची क्षमता विकसित होऊन परदेशातील कार्यसंस्कृतीशी जुळवून घेणे अधिक सुलभ होईल. सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि शिस्तबद्ध कामकाजाची सवय लागल्याने रोजगार टिकवून ठेवण्याची क्षमता वाढेल आणि भविष्यात अधिक चांगल्या आंतरराष्ट्रीय करिअरच्या संधी उपलब्ध होतील, असा शासनाचा विश्वास आहे.

यासंदर्भातील शासन निर्णय कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने जारी केला असून तो महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

याबाबत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारताला जागतिक दर्जाच्या कौशल्यसंपन्न मनुष्यबळाचे केंद्र बनविण्याचा राज्य शासनाचा दृढ संकल्प आहे. भारतीय युवकांना जागतिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत भारताला जगातील सर्वाधिक विश्वासार्ह स्किल टॅलेंट हब म्हणून विकसित करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे."

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS