
मुंबई | जेपीएन न्यूज - दि. 23 : विक्रोळी डेपोतून वांद्रा (पश्चिम) बस स्थानकाकडे जाणाऱ्या A-422/36 मार्गावरील BEST बसचा गुरुवारी सकाळी 11.05 वाजता पवई विहार संकुल परिसरात अपघात झाला. बसने रस्त्यावरील दुभाजकाला (डिव्हायडर) धडक दिल्याने बसमधील सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले.
BEST प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बस चालकाच्या डाव्या बाजूने एक कार येत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. चालकाचे लक्ष त्या कारकडे गेल्याने बसचा ताबा सुटून उजव्या बाजूच्या दुभाजकाला बसची धडक बसली. या अपघातात बसमधील सहा प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.
जखमींमध्ये अजय शिंदे (21), साक्षी पिसाळ (23), बबर सिंह (20), मनोज गुप्ता (41), प्रणिती माळी (25) आणि नदिर शाह चिकोडे (35) यांचा समावेश आहे. सर्व जखमींना बसच्या वाहकाने साकीनाका येथील पॅरामाउंट रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच BESTचे अपघात निरीक्षक, बस निरीक्षक तसेच संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचे नेमके कारण आणि पुढील कार्यवाहीसाठी तपास सुरू असल्याचे BEST प्रशासनाने सांगितले आहे.


No comments:
Post a Comment