भारतीय संस्कृतीचे वेगळेपण जगासमोर मांडण्याची गरज; मुलींचे शिक्षण हीच खरी राष्ट्रनिर्मिती - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 July 2026

भारतीय संस्कृतीचे वेगळेपण जगासमोर मांडण्याची गरज; मुलींचे शिक्षण हीच खरी राष्ट्रनिर्मिती - मुख्यमंत्री


मुंबई / JPN NEWS - भारतीय संस्कृती आणि भारतीय भाषांचे वैशिष्ट्य जगासमोर अधिक ठळकपणे मांडण्याची गरज असून मुलींचे शिक्षण, संरक्षण आणि आर्थिक सक्षमीकरण हीच खरी राष्ट्रनिर्मिती असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. घाटकोपर येथील एसपीआरजे कन्याशाळेत आयोजित 'सुकन्या समृद्धी योजना' अंतर्गत बालिकांच्या आर्थिक सक्षमीकरण कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी आमदार प्रसाद लाड, आमदार राम कदम, गौरव भंडारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ, बँकांचे प्रतिनिधी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन आणि सर्वसमावेशक संस्कृती असून प्रत्येकाला समान संधी देण्याचा संदेश ती देते. समाजातील प्रत्येक घटकाला, विशेषतः मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे ही भारतीय परंपरेची ओळख आहे. गेल्या शतकभरात अशा शैक्षणिक संस्थांमधून शिक्षण घेतलेल्या हजारो मुलींनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

पाश्चात्त्य विचारसरणी स्पर्धा आणि सामर्थ्यावर भर देते, तर भारतीय संस्कृती प्रत्येक व्यक्तीला प्रगतीची समान संधी मिळावी, यावर विश्वास ठेवते. समाजातील सक्षम घटकांनी दुर्बलांना आधार देणे हीच भारतीय संस्कृतीची खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानामुळे महिला शिक्षण आणि सक्षमीकरणाला देशभर नवी दिशा मिळाली. जगातील ज्या राष्ट्रांनी महिलांना शिक्षण, कौशल्य आणि समान संधी दिल्या, ती राष्ट्रेच प्रगतीच्या शिखरावर पोहोचली आहेत. मुलींच्या शिक्षणासाठी आणि भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी 'सुकन्या समृद्धी योजना' प्रभावी ठरत असून या उपक्रमाअंतर्गत एक हजार मुलींच्या खात्यांमध्ये प्रत्येकी 20 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. पुढील दहा वर्षे दरवर्षी तेवढीच रक्कम जमा केली जाणार आहे.

समाजात मुलींना ओझे समजण्याच्या चुकीच्या मानसिकतेमुळे स्त्रीभ्रूणहत्येसारख्या गंभीर समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे मुलींचे संरक्षण, शिक्षण आणि आर्थिक सक्षमीकरण ही केवळ शासनाची नव्हे, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. शिक्षणाच्या बळावर सक्षम झालेल्या युवक-युवतींनी गरजू आणि वंचित घटकांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविणाऱ्या गौरव भंडारी यांच्या कार्याचे कौतुक केले. ट्रस्टच्या माध्यमातून दहा वर्षांखालील मुलींची सुकन्या समृद्धी योजना आणि दहा वर्षांवरील मुलींची एनपीएस वात्सल्य योजना अंतर्गत नोंदणी करण्यात आली. कार्यक्रमात मुख्यमंत्री यांच्या हस्ते विद्यार्थिनी आणि त्यांच्या मातांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशांचे वितरण करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS