
मुंबई JPN NEWS - मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दिशेने बेस्ट उपक्रमाने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. बेस्ट समितीच्या बैठकीत १५० दुमजली वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्यांच्या खरेदीचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आधुनिक आणि पर्यावरणपूरक बससेवेची भर पडणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला. ११ ऑगस्ट २०२६ रोजी बेस्ट उपक्रमाच्या अध्यक्षा तृष्णा चंद्रकांत विश्वासराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यावेळी बेस्टच्या महाव्यवस्थापक डॉ. सोनिया सेठी उपस्थित होत्या.
प्रवाशांच्या सुविधांना प्राधान्य -
नवीन दुमजली इलेक्ट्रिक बसगाड्या वातानुकूलित असणार असून, प्रवाशांच्या सोयीसाठी त्यामध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. बसमध्ये दोन्ही बाजूंना स्वयंचलित प्रवेशद्वार, सीसीटीव्ही यंत्रणा आणि मोबाईल चार्जिंगची सुविधा असणार आहे.
इलेक्ट्रिक बसगाड्यांमुळे पारंपरिक इंधनावरील बसच्या तुलनेत प्रदूषण कमी करण्यास मदत होणार असून, मुंबईच्या पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीला यामुळे चालना मिळणार आहे.
‘ओपन डेक’ बसचाही विचार -
दरम्यान, १५० बसगाड्यांपैकी काही बसगाड्या ‘ओपन डेक’ स्वरूपात उपलब्ध करून देण्याची सूचना बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी केली आहे. त्यामुळे मुंबईच्या पर्यटन आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवा अनुभव मिळण्याची शक्यता आहे.
बेस्टच्या ताफ्यात आणखी आधुनिक बस -
मुंबईतील प्रवाशांची वाढती संख्या आणि सार्वजनिक वाहतुकीची गरज लक्षात घेऊन बेस्टच्या ताफ्यात बसगाड्यांची संख्या वाढविण्याची प्रक्रिया सुरू आहे. विविध बसपुरवठादार संस्थांना कार्यादेश देण्यात आले असून, आगामी काळात एकमजली आणि दुमजली वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्यांची संख्या आणखी वाढणार आहे.
नवीन बसगाड्यांच्या समावेशामुळे मुंबईकरांना अधिक आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळण्यासोबतच शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक आधुनिक व पर्यावरणपूरक करण्यास मदत होणार आहे.


No comments:
Post a Comment