
राजापूर / रत्नागिरी JPN NEWS - तालुक्यातील मोसम गावाजवळ रेल्वे बोगद्याच्या परिसरात रेल्वे रुळावर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. रेल्वे ट्रॅक क्रमांक २७१/१० ते २७१/२ दरम्यान बुधवारी (१९ ऑगस्ट) सायंकाळी हा प्रकार निदर्शनास आला.
मोसम-तावडेवाडीचे पोलीस पाटील उदय वासुदेव तावडे यांनी सायंकाळी सुमारे सहा वाजता याबाबत राजापूर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला.
प्राथमिक तपासात संबंधित व्यक्ती धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. या घटनेची राजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक ५२/२०२६ अशी नोंद करण्यात आली असून, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये पुढील कार्यवाही सुरू आहे.
मृत व्यक्तीचे वर्णन
मृत व्यक्तीचे वय अंदाजे ५५ ते ६० वर्षे असून वर्ण सावळा आहे. केस काळे-पांढरे आहेत. अंगावर गुलाबी रंगाचा साधा फुल शर्ट, पांढरी बनियन आणि पांढऱ्या रंगाची लुंगी होती. तसेच चॉकलेटी रंगाची AURX कंपनीची हाफ अंडरवेअर आणि डाव्या मनगटावर काळ्या रंगाचे स्टेनलेस स्टीलचे घड्याळ आढळले.
या वर्णनावरून मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. संबंधित व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास किंवा आपल्या परिचयातील व्यक्ती बेपत्ता असल्यास तातडीने राजापूर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी पोलीस निरीक्षक अमित यादव (९२७३९२६४२०), पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे (७३५००२८४८२) किंवा पोलीस हेडकॉन्स्टेबल रहीम मुजावर (७२७२८६६७८६) यांच्याशी संपर्क साधावा, असे पोलिसांनी कळविले आहे.


No comments:
Post a Comment