मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधेचा त्रास; कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात उपचार सुरू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 August 2026

मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधेचा त्रास; कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात उपचार सुरू


मुंबई | JPN NEWS : कुर्ला पश्चिम येथील सुंदरबाग परिसरात मोमोज खाल्ल्यानंतर तब्बल १६ जणांना अचानक उलट्या, जुलाब, ताप, पोटदुखी आणि चक्कर येण्याचा त्रास झाल्याची घटना समोर आली आहे. प्रकृती बिघडल्यानंतर बाधितांना तातडीने कुर्ला येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मोमोज खाल्ल्यानंतर काही नागरिकांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर एकूण १६ जणांना फूड पॉइझनिंगसदृश लक्षणे दिसून आली. त्यापैकी १४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दोन रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. बाधितांमध्ये लहान मुलांसह महिला आणि पुरुषांचा समावेश आहे.

रुग्णांमध्ये प्रामुख्याने उलट्या आणि जुलाबाची लक्षणे आढळून आली. काहींना ताप, पोटदुखी तसेच चक्कर येण्याचा त्रासही झाला. रुग्णालय प्रशासनाकडून सर्व बाधितांची तपासणी करून त्यांच्या प्रकृतीनुसार उपचार केले जात आहेत.

घटनेची माहिती मिळताच मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी भाभा रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. तसेच डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाशी चर्चा करून उपचारांबाबतची माहिती जाणून घेतली.

दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून, संबंधित प्रकरणाची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मोमोज खाल्ल्यानंतरच संबंधितांना त्रास झाला का, तसेच अन्नातून विषबाधा होण्यामागे नेमके कारण काय आहे, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून केला जाणार आहे.

सध्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत असून, सर्वांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. तपासणीनंतर या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS