प्रलंबित मागण्यांसाठी एफ/दक्षिण विभागातील सफाई कामगारांचे ३१ ऑगस्टला आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 August 2026

प्रलंबित मागण्यांसाठी एफ/दक्षिण विभागातील सफाई कामगारांचे ३१ ऑगस्टला आंदोलन


मुंबई | JPN NEWS : मुंबई महापालिकेच्या एफ/दक्षिण विभागातील घनकचरा व्यवस्थापन खात्यात कार्यरत सफाई कामगारांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी म्युनिसिपल मजदूर युनियनच्या नेतृत्वाखाली ३१ ऑगस्ट रोजी तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत. दुपारी १२ वाजता एफ/दक्षिण विभागीय कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार असून, त्यानंतर सहाय्यक आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.

सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत संघटनेने यापूर्वीही प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला आहे. मात्र, मागण्यांवर कार्यवाही होण्यास विलंब होत असल्याने कामगारांमध्ये नाराजी असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

एफ/दक्षिण विभागातील सफाई चौक्यांची दुरवस्था हा प्रमुख प्रश्न असून, कामगारांच्या संख्येच्या तुलनेत चौक्यांमध्ये अपुरी जागा असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आवश्यक ठिकाणी पक्क्या व पुरेशा क्षमतेच्या सफाई चौक्यांची उभारणी करावी, अशी मागणी आहे. तसेच कामगारांसाठी शौचालये, चेंजिंग रूम, स्वच्छ पिण्याचे पाणी, पाण्याचे कूलर आणि हात-पाय धुण्यासाठी पुरेशा पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कामासाठी आवश्यक साहित्य वेळेवर उपलब्ध होत नसल्याचाही प्रश्न संघटनेने उपस्थित केला आहे. याशिवाय अनेक प्राथमिक सुविधांचा अभाव असल्याने कामगारांना गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सेवा समाप्तीनंतर मिळणारे पेन्शन, ग्रॅच्युइटी आणि कुटुंब निवृत्ती वेतनाचे दावे निकाली काढण्यास होणारा विलंब, कालबद्ध पदोन्नती, सहाव्या वेतन आयोगानुसार मिळणारी थकबाकी तसेच कामगारांना देण्यात येणाऱ्या आवश्यक वस्तू आणि साहित्याचा प्रश्नही प्रलंबित असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

या सर्व मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कामगार लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असून, एफ/दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना मागण्यांचे निवेदन सादर केले जाणार आहे.

या आंदोलनात म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव, सरचिटणीस वामन कविस्कर, चिटणीस ओ. आर. पटेल, संघटक मनोहर कांबळे, चंद्रकांत कांबळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि एफ/दक्षिण विभागातील सफाई कामगार सहभागी होणार आहेत.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS