महाराष्ट्रातील २.०७ कोटी मतदार ‘अनकलेक्टेबल’; SIRमध्ये ७.७१ कोटी मतदारांचे गणना प्रपत्र पूर्ण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 August 2026

महाराष्ट्रातील २.०७ कोटी मतदार ‘अनकलेक्टेबल’; SIRमध्ये ७.७१ कोटी मतदारांचे गणना प्रपत्र पूर्ण


मुंबई JPN NEWS - महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेत घरोघरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेण्याची मोहीम १७ ऑगस्ट रोजी पूर्ण झाली. राज्यातील एकूण ९.७८ कोटी मतदारांपैकी ७.७१ कोटी म्हणजेच ७८.८५ टक्के मतदारांनी गणना प्रपत्र भरून स्वाक्षरी करून दिली आहे. तर २.०७ कोटी म्हणजेच २१.१५ टक्के मतदार ‘Uncollectable EF’ या गटात समाविष्ट करण्यात आले आहेत.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, SIR अंतर्गत घरोघरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेण्याची प्रक्रिया ३० जून ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात आली.

२.०७ कोटी मतदारांची वर्गवारी - 
‘Uncollectable EF’ गटातील २.०७ कोटी मतदारांमध्ये ७५.५२ लाख मतदार आढळून न आलेले किंवा गैरहजर, तर ७६.८० लाख मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित असल्याचे निदर्शनास आले आहे.

तसेच ३४.८१ लाख मतदार मृत, १७.६३ लाख मतदार अन्यत्र नोंदणी केलेले किंवा डुप्लिकेट, तर २.२३ लाख मतदार इतर कारणांमुळे या गटात समाविष्ट करण्यात आले आहेत.

निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे की, या मतदारांची नावे तातडीने अंतिम मतदार यादीतून वगळण्यात आलेली नाहीत. ‘Uncollectable EF’ गटातील मतदारांच्या तात्पुरत्या याद्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या असून, राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना (BLA) संबंधित मतदारांबाबत माहिती देण्याची संधी देण्यात आली आहे.

प्रारूप मतदार यादी लवकरच प्रसिद्ध होणार -
विशेष सखोल पुनरिक्षणानंतर प्रारूप मतदार यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ज्या मतदारांची नावे प्रारूप यादीत समाविष्ट झालेली नाहीत, त्यांच्या नावांची यादी संबंधित शासकीय कार्यालयांच्या सूचना फलकांवर तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर एक महिन्याच्या कालावधीत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. प्रारूप यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना तसेच १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकापूर्वी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नव्या मतदारांना या कालावधीत मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना ६ भरता येणार आहे.

मतदार यादीतील नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना ८, तर चुकीची किंवा अपात्र नोंद वगळण्यासाठी संबंधित मतदाराला नमुना ७द्वारे हरकत घेता येणार आहे.

अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबरला - 
दावे आणि हरकतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट केली जाणार आहेत. महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना खोटी घोषणा किंवा चुकीचे विधान केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम ३१नुसार एक वर्षापर्यंतची शिक्षा, दंड किंवा दोन्ही होऊ शकतात, असा इशाराही निवडणूक विभागाने दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS