
मुंबई JPN NEWS - पादचाऱ्यांसाठी रस्ते आणि पदपथ अधिक सुरक्षित, सुलभ व अडथळामुक्त करण्याच्या उद्देशाने मुंबई महापालिकेच्या ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानांतर्गत प्रभादेवी रेल्वे स्थानक परिसराची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी मंगळवारी (१८ ऑगस्ट) पाहणी केली. यावेळी स्थानक परिसरातील पदपथ, पादचारी पूल, प्रवेश-निर्गमन मार्ग आणि वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
प्रभादेवी रेल्वे स्थानकातील विद्यमान पादचारी पुलाच्या प्रस्तावित जिन्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना वर्मा-लवंगारे यांनी पश्चिम रेल्वेला दिल्या. महापालिकेने ‘पे अँड यूज’ प्रसाधनगृहासाठी जागा उपलब्ध करून दिली असल्याने प्रस्तावित जिन्याचे काम तातडीने पुढे नेण्याचे निर्देश देण्यात आले.
पादचारी पुलाच्या दक्षिणेकडील प्रवेश-निर्गमन मार्गाचे रुंदीकरण करताना प्रसाधनगृह हटविण्याची आवश्यकता भासल्यास, त्यासाठी पर्यायी प्रसाधनगृहाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशाही सूचना देण्यात आल्या. तसेच प्रस्तावित पादचारी पुलाच्या संरेखनाची व्यवहार्यता तपासून पुलाच्या उतरणीसाठी आवश्यक जागेबाबत महापालिका आणि पश्चिम रेल्वेने समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले.
अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना -
रेल्वे स्थानक आणि परिसरातील अनधिकृत अतिक्रमणे प्राधान्याने हटविण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. प्रवाशांना स्थानकातून बाहेर पडताना तसेच परिसरात ये-जा करताना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यास सांगण्यात आले.
स्थानक परिसरातील गर्दी कमी करण्यासाठी शेअर टॅक्सी थांबा आणि टॅक्सी प्रवासी उतरण्याच्या ठिकाणांचे योग्य नियोजन करून आवश्यकतेनुसार त्यांचे स्थलांतर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण, ‘आपला दवाखाना’चा प्रस्ताव -
प्रभादेवी स्थानक परिसराची सर्वंकष स्वच्छता करून आवश्यक ठिकाणी संपर्क व पोहोच रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण (Resurfacing) करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच नमन मीडटाउन आणि इंडिया बुल्स बिझनेस पार्कदरम्यान स्थानकाच्या प्रवेश-निर्गमन मार्गाचे रुंदीकरण करण्याबाबतही चर्चा झाली. स्थानक परिसरात ‘आपला दवाखाना’ उभारण्याच्या प्रस्तावावरही यावेळी चर्चा करण्यात आली.
पादचारी, रेल्वे प्रवासी आणि नागरिकांना सुरक्षित, अडथळामुक्त व सुलभ वाहतूक व्यवस्था मिळण्यासाठी महापालिका, पश्चिम रेल्वे, एमएमआरडीए, एमआरआयडीसीएल आणि वाहतूक पोलिसांनी परस्पर समन्वयाने आवश्यक कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी दिले.
पाहणीवेळी जी-दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर, पश्चिम रेल्वेचे मुंबई सेंट्रल विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज सिंह, तसेच पश्चिम रेल्वे, एमएमआरडीए, एमआरआयडीसीएल आणि वाहतूक पोलिसांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment