छत्तीसगडमध्ये मुंबईच्या २४ वर्षीय महिला बायकरचा अपघाती मृत्यू; ट्रेलर चालकाचा शोध सुरू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 August 2026

छत्तीसगडमध्ये मुंबईच्या २४ वर्षीय महिला बायकरचा अपघाती मृत्यू; ट्रेलर चालकाचा शोध सुरू


मुंबई JPN NEWS - मुंबईतील २४ वर्षीय महिला बायकर रिद्धी दिव्येश ठक्कर हिचा छत्तीसगडमध्ये झालेल्या भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाला. कांदिवली पश्चिम येथील रहिवासी असलेली रिद्धी बाईकिंग आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ओळखली जात होती. ती मुंबईतील बायकर ग्रुपसोबत छत्तीसगडमधील बस्तर भागाच्या बाईक ट्रिपवर गेली होती.

बुधवारी धमतरी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३० वर मार्काटोला घाटाजवळ हा अपघात झाला. रिद्धीच्या मोटरसायकलला ट्रेलरने धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर रिद्धीला प्रथम चारामा येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने तिला पुढील उपचारासाठी धमतरीतील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

रिद्धी ही सुमारे २३ जणांच्या बायकर ग्रुपसोबत रायपूरहून बस्तरच्या दिशेने जात होती. या प्रवासादरम्यान काळाने तिच्यावर घाला घातला. अपघातानंतर ट्रेलर चालक घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी तपास सुरू केला असून, चालकाचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

रिद्धीच्या मृत्यूची बातमी मुंबईतील बायकर आणि ट्रॅव्हलिंग कम्युनिटीसाठी मोठा धक्का ठरली आहे. सोशल मीडियावरही तिच्या प्रवासाची आणि बाईकिंगची आवड अधोरेखित झाली असून, अपघातापूर्वी तिने बस्तर ट्रिपसंदर्भात पोस्ट केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, रिद्धीचा मृतदेह धमतरी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला आहे. आवश्यक वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे मुंबईतील एका तरुण बायकरचा बस्तरच्या प्रवासात झालेला अंत आणि महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. फरार ट्रेलर चालकाचा शोध घेऊन अपघाताचे नेमके कारण स्पष्ट करण्याचे आव्हान आता छत्तीसगड पोलिसांसमोर आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS