
मुंबई - JPN NEWS, दि. ७ ऑगस्ट २०२६ :
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (BMC MARD) ने सुरू असलेले नियमित वैद्यकीय सेवा बंद आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे नियमित ओपीडी, आयपीडी, नियोजित शस्त्रक्रिया, शैक्षणिक उपक्रम, सेंट्रल लॅबोरेटरी, फीव्हर ओपीडी आणि अन्य स्थगित सेवा पूर्ववत सुरू होणार आहेत.
बीएमसी मार्डने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सीसीएमपी पात्रता असलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (एमएमसी) नोंदणी देण्याच्या प्रस्तावाविरोधातील आंदोलन सुरू असताना मुंबई उच्च न्यायालयाने निवासी डॉक्टरांनी सेवा बंद आंदोलन तातडीने मागे घ्यावे, तसेच सरकार आणि मार्ड प्रतिनिधींमध्ये चर्चेद्वारे तोडगा काढावा, असे निर्देश दिले आहेत.
उच्च न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान राखत आणि रुग्णसेवा अखंडित ठेवण्याच्या उद्देशाने सेवा बंद आंदोलन मागे घेत असल्याचे बीएमसी मार्डने स्पष्ट केले आहे. मात्र, बीएचएमएस-सीसीएमपी डॉक्टरांच्या एमएमसी नोंदणीला विरोध कायम असून आपल्या मागण्या आणि कायदेशीर हक्कांवर कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही, असेही संघटनेने स्पष्ट केले.
आंदोलनादरम्यान आपत्कालीन सेवा, कॅज्युअल्टी, आयसीयू आणि इतर जीव वाचविणाऱ्या सेवा अखंडित सुरू होत्या, याचीही बीएमसी मार्डने आठवण करून दिली.
सरकारसोबत चर्चेतून समाधानकारक तोडगा न निघाल्यास, कायद्याच्या चौकटीत राहून आणि लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल, असा इशाराही बीएमसी मार्डने दिला आहे. उच्च न्यायालयाचा सविस्तर लेखी आदेश येण्याची प्रतीक्षा असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment