जन्म-मृत्यू-विवाह प्रमाणपत्र आता अवघ्या ३ कार्यालयीन दिवसांत मिळणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 August 2026

जन्म-मृत्यू-विवाह प्रमाणपत्र आता अवघ्या ३ कार्यालयीन दिवसांत मिळणार


मुंबई JPN NEWS | ११ ऑगस्ट २०२६ - 
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने जन्म, मृत्यू आणि विवाह प्रमाणपत्राशी संबंधित सेवा अधिक सुलभ करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, नवीन जन्म, मृत्यू आणि विवाह प्रमाणपत्रासाठी नोंदणी केल्यानंतर प्रमाणपत्र अवघ्या तीन कार्यालयीन दिवसांत उपलब्ध होणार आहे. तसेच जन्म प्रमाणपत्रात बालकाचे नाव समाविष्ट करण्याची सुविधाही तीन कार्यालयीन दिवसांत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महापालिकेच्या प्रशासकीय कार्यालयांमधील नागरी सुविधा केंद्रांमध्ये (CFC) जन्म व मृत्यू नोंदणीसह विविध प्रकारच्या दुरुस्ती अर्जांची स्वीकृती सुरू करण्यात आली आहे. यासाठी जन्म व मृत्यू नोंदणी (RBD) पोर्टलचा वापर केला जात आहे.

जन्म प्रमाणपत्रातील नावाची नोंद तीन दिवसांत - 
बालकाच्या जन्मानंतर १५ वर्षांच्या आत जन्म प्रमाणपत्रात नाव समाविष्ट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी अर्ज केल्यानंतर प्रमाणपत्र तीन कार्यालयीन दिवसांत उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

जन्म प्रमाणपत्रातील आई-वडिलांच्या नावातील दुरुस्ती, मूळ किंवा तात्पुरत्या पत्त्यातील दुरुस्ती, जन्मतारखेतील चूक, लिंगातील चूक आदींसाठीही नागरिकांना CFCमध्ये अर्ज करता येणार आहे.

दुरुस्तीच्या अर्जांसाठी निश्चित कालावधी - 
विवाह प्रमाणपत्रातील दुरुस्ती तीन कार्यालयीन दिवसांत, तर जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रातील विविध प्रकारच्या दुरुस्त्या २५ कार्यालयीन दिवसांत करून देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

याशिवाय मृत्यू प्रमाणपत्रातील दुरुस्ती, जुन्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्राचे QR कोडयुक्त प्रमाणपत्रात रूपांतर आदी सेवांसाठीही नागरी सुविधा केंद्रांमध्ये अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

अर्ज केल्यानंतर नागरिकांना युनिक आयडीच्या माध्यमातून अर्जाच्या स्थितीचा मागोवा घेता येणार आहे. हा युनिक आयडी अर्जासोबतच्या पोचपावतीवर नमूद करण्यात येईल.

जुन्या प्रमाणपत्राचे QR कोडयुक्त प्रमाणपत्र मिळणार - 
जुन्या जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्राचे नवीन QR कोडयुक्त प्रमाणपत्रात रूपांतर करण्यासाठी नागरी सुविधा केंद्रात स्वतंत्र खिडकी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जुन्या दाखल्याची उपलब्धता आणि महापालिकेच्या विभागस्तरीय नोंदींच्या पडताळणीनंतर QR कोडयुक्त प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवर संबंधित नोंद उपलब्ध नसल्यास प्रमाणपत्र मिळण्यास अधिक वेळ लागू शकतो.

या सेवेसाठी नागरिकांना जुन्या जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्राची मूळ प्रत सादर करावी लागणार आहे. साधारणपणे २५ कार्यालयीन दिवसांत QR कोडयुक्त प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा मानस आहे.

अर्जाची स्थिती CFCमध्येही कळणार - 
जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रातील दुरुस्तींसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकृतीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना नागरी सुविधा केंद्रातच आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेता येणार आहे.

नागरिकांनी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती देणारे फलक नागरी सुविधा केंद्रांमध्ये लावण्यात येणार आहेत.

महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या सुविधेबाबत व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत. तर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी नागरिकांना अर्ज प्रक्रिया सहज समजावी यासाठी नागरी सुविधा केंद्रांमध्ये माहितीपर फलक लावण्याच्या आणि जनजागृती वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

महापालिकेने स्पष्ट केले आहे की, निश्चित केलेला कालावधी हा प्रमाणित सेवा स्तर करारानुसार आहे. मात्र CRS प्रणालीची उपलब्धता, इंटरनेट, संबंधित कागदपत्रांची उपलब्धता, विभागाचा कार्यभार आणि जुन्या प्रमाणपत्रांच्या नोंदींची पडताळणी यामुळे प्रत्यक्ष प्रमाणपत्र मिळण्यास काही वेळ लागू शकतो.

नागरिकांसाठी उपलब्ध प्रमुख सेवा :
1 नवीन जन्म, मृत्यू व विवाह प्रमाणपत्रासाठी अर्ज

2 जन्म प्रमाणपत्रात बालकाचे नाव समाविष्ट करणे

3 जन्म प्रमाणपत्रातील विविध दुरुस्त्या

4 मृत्यू प्रमाणपत्रातील दुरुस्ती

5 विवाह प्रमाणपत्रातील दुरुस्ती

6 जुन्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्राचे QR कोडयुक्त प्रमाणपत्रात रूपांतर

7 अर्जाची स्थिती युनिक आयडीद्वारे तपासण्याची सुविधा

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS