
मुंबई JPN NEWS | ११ ऑगस्ट २०२६ -
खासगी शाळांकडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी फीविरोधात आता कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पहिली-दुसरीच्या शिक्षणासाठी तब्बल एक ते दीड लाख रुपये फी आकारली जात असेल, तर “दीड लाख रुपये घेऊन जगावेगळं काय शिकवतात?” असा सवाल करत खासगी शाळांच्या फीवर ‘कॅप’ लावण्याची मागणी त्यांनी केली आहे.
नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनानंतर आता कॉक्रोच जनता पार्टीने खासगी शाळांच्या कथित लुटमारीविरोधात मोर्चा वळवला आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील सरकारी शाळांची अवस्था सुधारण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती दीपके यांनी दिली.
माध्यमांशी संवाद साधताना दीपके यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांचा काळ उलटूनही ग्रामीण भागातील सरकारी शाळांची अवस्था अत्यंत खराब आहे. शेतकरी आणि मजुरांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी असून, या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करून देशाचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले.
खासगी शाळांच्या फीवर नियंत्रण हवे -
खासगी शाळांच्या फीबाबत बोलताना दीपके म्हणाले की, शिक्षणाच्या नावाखाली पालकांची लूट सुरू आहे. पहिली-दुसरीच्या वर्गासाठी एक ते दीड लाख रुपये फी आकारणे योग्य नाही. विद्यार्थ्यांना एबीसीडी शिकवण्यासाठी एवढी मोठी रक्कम आकारली जाते, असा आरोप त्यांनी केला.
“शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे, तो व्यवसाय नाही,” असे सांगत खासगी शाळांच्या फीवर सरकारने ‘फी कॅप’ निश्चित करावा, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत त्यांच्या पक्षाची योजनांचा अभ्यास करणारी टीम काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
खासगी शाळा आणि कोचिंग क्लासेस चालविणाऱ्यांनी मध्यमवर्गीय पालकांची आर्थिक लूट करू नये. शिक्षण द्यायचे असेल तर ते केवळ व्यवसाय म्हणून नव्हे, तर विद्यादानाच्या भावनेने दिले पाहिजे, असे आवाहन दीपके यांनी केले.
ग्रामीण शाळांसाठी गावकऱ्यांना सोबत घेणार -
ग्रामीण भागातील सरकारी शाळांच्या सुधारणेसाठी सरकारला प्रस्ताव देण्याबरोबरच गावकऱ्यांना या मोहिमेत सहभागी करून घेणार असल्याचे दीपके यांनी सांगितले. गावांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास पूर्ण होऊ शकत नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
याच मोहिमेअंतर्गत १५ ऑगस्ट रोजी हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी गावाला भेट देणार असून, गावातील सरकारी शाळेसाठी आवश्यक सुधारणा करण्याबाबत सरपंचांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरही संताप -
दरम्यान, दिल्ली आणि झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनांचा संदर्भ देत दीपके यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या वापरावरही तीव्र नाराजी व्यक्त केली. आपल्या हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून बळाचा वापर का केला जातो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
विद्यार्थी नेते देवेंद्रनाथ महतो यांच्याशी आपण बोललो असल्याचे सांगत त्यांनी नऊ दिवसांच्या उपोषणानंतरही त्यांच्यावर लाठीचार्ज झाल्याचा दावा केला. विद्यार्थ्यांवर अत्याचार करून प्रश्न सुटणार नाहीत. विद्यार्थी कोणत्याही व्होटबँकेसाठी नव्हे, तर आपल्या हक्कांसाठी लढत आहेत, असे दीपके यांनी म्हटले.
खासगी शिक्षणातील अवाजवी फी आणि ग्रामीण सरकारी शाळांची दुरवस्था या दोन्ही मुद्द्यांवर सरकारने तातडीने ठोस धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


No comments:
Post a Comment