मुलुंडमध्ये ‘पादचारी प्रथम’ अभियानाला वेग; ४० पावसाळी छतांसह ८ अनधिकृत दुकाने, ३० फेरीवाल्यांवर कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 August 2026

मुलुंडमध्ये ‘पादचारी प्रथम’ अभियानाला वेग; ४० पावसाळी छतांसह ८ अनधिकृत दुकाने, ३० फेरीवाल्यांवर कारवाई


मुंबई JPN NEWS | ११ ऑगस्ट २०२६ -
मुंबई महापालिकेच्या ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानांतर्गत मुलुंड परिसरातील पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी महापालिकेने मोठी कारवाई केली. ‘टी’, ‘एस’ आणि ‘एन’ विभागांच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत ४० पावसाळी छत, ८ अनधिकृत दुकाने आणि ३० फेरीवाले हटविण्यात आले. याशिवाय पदपथांवर अडथळा निर्माण करणारे ६ वाहनमार्गही निष्कासित करण्यात आले.

महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार शहरातील पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी ‘पादचारी प्रथम’ अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुलुंड परिसरात ही संयुक्त मोहीम राबविण्यात आली.

उपायुक्त (परिमंडळ-६) संतोषकुमार धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘टी’ विभागाच्या सहायक आयुक्त योगिता कोल्हे, ‘एस’ विभागाच्या सहायक आयुक्त समरीन सय्यद आणि ‘एन’ विभागाचे सहायक आयुक्त जयदीप मोरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

मुलुंड पूर्व-पश्चिम भागात कारवाई - 
मुलुंड पश्चिम येथील राम रतन त्रिवेदी मार्ग, जवाहरलाल नेहरू मार्ग, सेवाराम लालवाणी मार्ग, रतनजी हिरजी भोगराज मार्ग, झवेर मार्ग आणि गणेश गावडे मार्ग, तसेच मुलुंड पूर्वेकडील लोकमान्य टिळक मार्ग आणि नवघर मार्ग परिसरात कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत पदपथांवर उभारण्यात आलेली ४० पावसाळी छत आणि ८ अनधिकृत दुकाने हटविण्यात आली. तसेच पदपथांवर अडथळा निर्माण करणाऱ्या ३० फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. पदपथांवर अडथळा निर्माण करणारे ६ वाहनमार्गही निष्कासित करण्यात आले.

या कारवाईसाठी १३ दुय्यम अभियंते, ७ अनुज्ञापन निरीक्षक आणि ६६ कामगारांसह महापालिकेचे पथक तैनात करण्यात आले होते. कारवाईसाठी १० वाहने, ५ डंपर आणि ५ जेसीबी तसेच अन्य यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. यावेळी पुरेसा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

महापालिका प्रशासनाने पादचाऱ्यांसाठी सुरक्षित, अडथळामुक्त आणि सुलभ पदपथ उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे नागरिकांनी पदपथांवर अनधिकृत बांधकाम किंवा कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करून पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करू नये. असे अतिक्रमण आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS