
मुंबई - JPN NEWS, दि. ४ ऑगस्ट २०२६:
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ‘सक्षम कौशल्य जनगणना’ या अभिनव उपक्रमाच्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे रोजगार, कौशल्य विकास आणि स्वयंरोजगाराला नवी दिशा मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार, मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
'सक्षम कौशल्य जनगणना' हा मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेला देशातील पहिला एआय-सक्षम हायपरलोकल कौशल्य जनगणना उपक्रम आहे. रोजगाराच्या संधी, कौशल्य प्रशिक्षण आणि स्वयंरोजगारासाठी आवश्यक डेटा तयार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमांतर्गत ५९,८२४ कुटुंबांचे सर्वेक्षण, ४४,९८२ उमेदवारांची नोंदणी, १,०१८ नियोक्ते आणि ५२ प्रशिक्षण संस्थांचा सहभाग नोंदविण्यात आला आहे. सर्वेक्षणातून बेरोजगार युवक, कौशल्यवृद्धीची गरज असलेले उमेदवार, स्वयंरोजगार इच्छुक आणि गृहिणींसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती संकलित करण्यात आली आहे.
सर्वेक्षणात जवळपास ९८ टक्के नागरिकांकडे औपचारिक कौशल्य प्रमाणपत्र नसल्याचे आढळून आले. त्यानुसार ३२ हजारांहून अधिक उमेदवारांना वैयक्तिक करिअर मार्गदर्शन, २२ हजारांहून अधिक जणांना कौशल्य प्रशिक्षण, ५,८०० पेक्षा अधिक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी, तर १,६९० हून अधिक उमेदवारांशी नियोक्त्यांनी थेट भरतीसाठी संपर्क साधला आहे.
याशिवाय ४ हजारांहून अधिक इच्छुक उद्योजकांना प्रशिक्षण आणि व्यवसाय मार्गदर्शन, तर ६ हजारांहून अधिक गृहिणी, दिव्यांग आणि वंचित घटकांना कौशल्य प्रशिक्षण व स्वयंरोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
उपक्रमाच्या पुढील टप्प्यात वॉर्डस्तरीय रोजगार मेळावे, उद्योगनिहाय कौशल्य प्रशिक्षण, पीएमईजीपी व मुद्रा यांसारख्या योजनांशी जोडणी, उद्योजकता मार्गदर्शन, अप्रेंटिसशिप आणि एआय-आधारित कौशल्य डेटाबेस अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार असल्याचे कॉफी टेबल बुकमध्ये नमूद करण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment